Menu

देश
नौदलाची क्षमता दुपटीनं वाढली; आय.एन.एस. खांदेरी’ नौदलाच्या ताफ्यात दाखल

nobanner

संपूर्ण भारतीय बनावटीच्या, अद्ययावत अशी ‘आय.एन.एस. खांदेरी’ ही पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते ही पाणबुडी देशसेवेत रूजू करण्यात आली. पाणबुडीच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. कलवरी श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी असून डिझेल-विद्युत प्रकारातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे.

“मुंबईवर २६/११ रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तसाच कट आता पुन्हा रचला जात आहे. तो आता यशस्वी होऊ देणार नाही. कोणीही देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर नौदलाकडून त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल,” असं राजनाथ सिंग यावेळी म्हणाले. “१९७१ च्या युद्धात नौदलाची भूमिका ही महत्त्वपूर्ण होती. भारतीय नौदलाने व्यापारी मार्गावर नियंत्रण मिळवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत त्यांचं कंबरडं मोडलं होतं. आयएनएस खांदेरीमुळे भारतीय नौदलाची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे, हे पाकिस्तानने आता लक्षात ठेवावं. देशातील सशस्त्र दलांच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आधुनिकीकरणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरूनच या पाणबुडीचं नाव ठेवण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचं सामर्थ्य ओळखलं होतं. त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याची क्षमता भारतीय नौदलात आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कलवरी श्रेणीतील सहा पाणबुडय़ा बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत ही दुसरी पाणबुडी नौदलात दाखल होत आहे. या पाणबुडीची बांधणी माझगाव डॉकने केली आहे. सध्या नौदलाकडील पाणबुडींची संख्या मर्यादित असून खांदेरीमुळे नौदलाच्या सामरिक ताकदीत वाढ होईल. पी १७ प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या ‘स्कॉर्पिअन’ या फ्रेंच तंत्राधारित उर्वरित चार पाणबुडी २०२३ पर्यंत नौदलात दाखल होतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘खांदेरी’च्या बांधणीचे काम एप्रिल २००९ मध्ये सुरू करण्यात आले, मध्यंतरी काही काळ फ्रेंच उत्पादकांच्या पुरवठा साखळीतील अडचणींमुळे बांधणीस काही काळ विलंब झाला. जून २०१७ पासून ऑगस्ट २०१९ पर्यंत तिच्या चाचण्या घेण्यात आल्या.

पर्मासिन मोटार’ या अद्ययावत तंत्राचा वापर केल्यामुळे ही पाणबुडी समुद्रातून जात असताना तिचा आवाजच येणार नाही. परिणामी शत्रूला चकवा देणे शक्य होईल असा विश्वास नौदल अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर अंतर्गत यंत्राचा आवाज बाहेर जाणारच नाही अशी यंत्रणादेखील यामध्ये कार्यरत आहे. खांदेरीवरील यंत्रणा स्वयंचलित आहे, त्यामुळे नौसैनिक-अधिकाऱ्यांची आवश्यकता निम्माने कमी झाली आहे. खांदेरी पाणबुडीमध्ये निर्णायक क्षणी सुटका करण्यासाठी कॉफरडॅम ही संकल्पना वापरण्यात आली आहे. निर्णायक क्षणी पाणबुडी सोडून बाहेर पडायचे असेल तेव्हा कॉफरडॅमच्या वापरामुळे पाणबुडीचा नियंत्रण कक्ष आणि इंजिन यामध्ये एक स्वतंत्र जागा उपलब्ध होते. त्यानंतर हॅचद्वारे पाणबुडी सोडून बाहेर पडता येते.

‘पाणबुडीच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत या चाचण्या घेतल्या असून त्या अत्यंत यशस्वी झाल्या आहेत. क्षेपणास्त्रे आणि पाणतीर (टॉर्पेडो) यांच्या क्षमतेची परमोच्च बिंदूपर्यत चाचणी घेतली आहे. संपूर्णपणे देशातच बांधलेल्या आणि सर्वात प्रगत अशा या पाणबुडीचे नेतृत्त्व करण्याचा मला अभिमान आहे,’ असे या पाणबुडीचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन दलबीर सिंग यांनी सांगितले. कॅप्टन दलबीर सिंग २० वर्षांपासून वेगवेगळ्या पाणबुडींवर कार्यरत असून यापूर्वी त्यांनी ‘सिंधूघोष’ या पाणबुडीचे नेतृत्व केले होते.

* अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापराने मनुष्यबळ निम्म्यावर
* ३६० बॅटरींचा वापर (प्रत्येकी ७५० किलो वजन)
* पर्मासिन मोटरच्या वापरामुळे आवाजच नाही
* ४ पाणतीर (टॉर्पेडो), २ क्षेपणास्त्रे डागण्याची यंत्रणा
* ताशी २० नॉटिकल मैल वेगाने जाण्याची क्षमता