देश
करोना लसीवर केंद्राचे सुप्रीम कोर्टात घुमजाव; डिसेंबरपर्यंत १३५ कोटी डोस उपलब्ध होणार
देशाला डेल्टा प्लस वेरियंटचा धोका असताना आता करोनावरील लसीच्या उपलब्धतेवरून ( covid vaccine ) केंद्र सरकारने घुमजाव केले आहे. देशात डिसेंबरपर्यंत करोनावरील लसीचे १३५ कोटी डोस ( Covid Vaccine Doses ) उपलब्ध होतील, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ( Supreme Court ) दाखल केलेल्या प्रतिज्ञापज्ञात म्हटलं आहे. मे महिन्यात करोनावरील लसीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यावेळी ३१ डिसेंबरपर्यंत देशात २१६ कोटींहून डोस उपलब्ध होतील, असं म्हटलं होतं.
१३ मे रोजी काय म्हणाले होते सरकार?
यापूर्वी केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी १३ मे रोजी मोठी घोषणा केली होती. डिसेंबर २०२१ पर्यंत करोनावरील लसीचे २१६ कोटी डोस उपलब्ध होतील, असं ते म्हणाले होते. एफडीए किंवा जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेली कुठलीही लस भारतात आणण्यास परवानगी दिली जाईल, असं पॉल म्हणाले होते.
करोनावरील लसींचे २१६ कोटी डोस कसे उपलब्ध होणार?
कोविशिल्ड ७५ कोटी, कोवॅक्सिन ५५ कोटी, बायो ई सब युनिट ३० कोटी, जायडस कॅडिला डीएनए ५ कोटी, सीरम इन्स्टिट्यूटची नोवावॅक्स २० कोटी, बीबी नेजल लसचे १० कोटी, जिनोवा एमआरएनएचे ६ कोटी आणि स्पुतनिक लसीचे १५.६ कोटी असे एकूण २१६.६ कोटी डोस या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत उपलब्ध होतील, असा दावा केंद्र सरकारने केला होता.