मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं तग धरला. ही स्थिती कायम असतानाच राज्याच्या कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढेल असा प्राथमिक इशारा जारी करण्यात आला आहे. राज्यातील घाटमाथ्यावरील परिस्थितीसुद्धा अशीच राहणार असून, केंद्रीय हवामानशास्त्र विभागानंसुद्धा पावसाच्या धर्तीवर राज्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे.
येत्या 5 दिवसांत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता
राज्यात पुढील 5 दिवसांत सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं कोकण किनारपट्टीवर हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये मॉन्सून सक्रिय होत असताना कोकणात मुसळधार, तर इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी बरसतील. राहिला मुद्दा इतका पाऊस आला कुठून? तर, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. ज्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सध्या घाटमाथ्यासह सातारा शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. धरण क्षेत्रात, डोंगराळ भागात आणि महाबळेश्वर, कोयना भागात पावसाची रिपरिप सुरू आहे, तर पाचगणीच्या वाटेवर धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.
रायगड आणि सिंधुदुर्गात गेल्या काही तासांपासून अत्यंत रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत असला तरीही दाट ढगाळ वातावरण आहे. ज्यामुळं इथंही पावसाच्या धर्तीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा जोर वाढण्यामागची कारणं काय?
ऑफ-शोर ट्रफ (Off-shore Trough)
सध्या दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपासून थेट कर्नाटक किनारपट्टीपर्यंत अरबी समुद्रात एक ‘ऑफ-शोर ट्रफ’ म्हणजेच कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून जात असल्यामुळे अरबी समुद्रातून प्रचंड प्रमाणात बाष्पयुक्त वारे जमिनीकडे खेचले जात आहेत. यामुळे कोकण आणि मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे.
पावसामागचं दुसरं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांची चक्राकार स्थिती. या स्थितीचं रूपांतर पुढील 2 ते 3 दिवसांत तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याचा अंदाज आहे. या प्रणालीमुळे मान्सूनचे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वेगाने वाहत असल्यानं राज्याच्य अंतर्गत भागांतही पावसाचा जोर वाढवला आहे.
मान्सूनला मिळालेला वेग…
सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी जून महिन्यात मान्सून काहीसा रेंगाळला असला तरीही जुलैच्या सुरुवातीपासूनच अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही बाजूंनी हवामान प्रणाली एकाच वेळी अनुकूल असल्यानं राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.
