काही दिवस मान्सूननं चकवा दिल्यानंतर आता हाच मोसमी पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सक्रीय झाला आहे. याच कारणामुळं पश्चिमेकडून येणारे वारे आणखी तीव्र जाले असून, पावसासाठी पूरक स्थिती तयार करत आहेत. या बदलामुळं महाराष्ट्रापासून कर्नाटकच्या किनारपट्टी भागापर्यंत ते अगदी केरळपर्यंत मान्सूनची सुरुवात झाली आहे.
6 जुलैपर्यंत फक्त आणि फक्त पाऊस…
स्कायमेट या खासगी हवामान यंत्रणेच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये 5 ते 6 जुलैपर्यंत मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सततचे पावसाळी ढग आणि पावसामुळं देशातील सरासरी तापमानात घट नोंदवली जाईल. ज्यामुळं वातावरण आल्हादायक झाल्याचं दिसून येईल. पावसाच्या सातत्यपूर्ण हजेरीमुळं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडू शकतात. तर, काही भागांमध्ये पूरस्थितीसुद्धा ओळखता येऊ शकते.
पावसामुळं अनके राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतात. 5 ते 6 जुलैदरम्यान दक्षिण मध्य प्रदेश ते उत्तर कोकण आणि गोवा इथं एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. ज्यामुळं येत्या काही दिवसांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील पर्जन्यमानाचा अंदाज पाहिल्यास इथंसुद्धा मान्सूनची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. सामान्य स्थितीमध्ये इथं 20 जूनपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस दाखल होतो. मात्र यंदाच्या वर्षी पावसाच्या वाऱ्यांचा वेग कमी असल्यामुळं इथं 10 दिवस पाऊस उशिरानं पोहोचला आहे. त्यामुळं आता तो नेमका कसा तग धरतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
उत्तर प्रदेशवर चक्राकार वारे सक्रीय आहेच, सोबतच बंगालच्या उपसागर क्षेत्रातून येणारे वारे देशाच्या पूर्वोत्तर भागांमध्ये पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळं उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे.
देशभरात पुढील 24 तासांत कसं असेल हवामान?
पुढील 24 तासांमध्ये गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि झारखंड, बिहार इथंसुद्धा मान्सून पुढं जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये उत्तर प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत मान्सून पुढे जाईल. त्यानंतर हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि दक्षिणपूर्व राजस्थानच्या भागांतून पुढे जाईल.
हवामान तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार पश्चिम बंगाल, उत्तर पूर्व भारत, ओडिशा, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकचा अंतर्गत भाग, तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार बेट समुह, लक्षद्वीप, उत्तराखंडमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
