Headlines

हायकोर्टाने तुकाराम मुंढेंच्या FDA ला झापलं! ‘या’ कंपनीवरील औषधविक्री बंदी मागे, कोर्ट म्हणालं, ‘रुग्णांना 20 दिवस…’

‘आधी गोळी झाडायची आणि नंतर प्रश्न विचारायचे’ ही पद्धत ‘वाइल्ड वेस्ट’मध्ये चालू शकते; मात्र कायद्याच्या क्षेत्रात ती चालणार नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे आयुक्त असलेल्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाला मंगळवारी फटकारले. कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या विविध औषधांच्या विक्री व वितरणावर घातलेल्या ‘विक्री बंदी’च्या आदेशांवरून न्यायालयाने एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

‘विक्री बंद’चे आदेश मागे घेण्याची तयारी

न्यायालयाच्या निरीक्षणानंतर एफडीएने ‘कॅडिला’विरोधातील विद्यमान ‘विक्री बंद’चे आदेश मागे घेण्याची तयारी दर्शवली, तसेच भविष्यात कारवाई करण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रिया पाळण्याची हमी दिली. प्रभारी मुख्य न्या. आर. व्ही. घुगे आणि न्या. गौतम अंकड यांच्या खंडपीठासमोर कॅडिला फार्मास्युटिकल्सने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली.

‘ते’ आदेश रद्द करा

एफडीएने कंपनीच्या काही औषधांचा साठा जप्त करून त्यांची विक्री व वितरण थांबविण्याचे निर्देश दिले होते. हे आदेश रद्द करण्याची मागणी कंपनीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ बीरेंद्र सराफ यांनी केली. ‘हॉटेलच्या बाबतीतही आधी कारवाई आणि नंतर प्रश्न विचारले जातात. या प्रकरणातही तेच घडत आहे,’ असे न्यायालयाने नमूद केले.

औषध न मिळणे हे गंभीर

आम्हाला याचिकाकर्त्यांच्या आर्थिक नुकसानीबाबत चिंता नाही. मात्र, रुग्णांना 20 दिवस औषध मिळाले नाही, तसेच त्याला आतापर्यंत प्रभावीपणे 32 दिवस झाले, हे गंभीर आहे. तसेच भविष्यात कायदेशीर प्रक्रिया न पाळता आदेश काढले गेले, तर एफडीएवर मोठा दंड लादला जाऊ शकतो, असा इशारा न्यायालयाने दिला.

नव्याने नोटीस देणार

भविष्यात कारवाई करायची असल्यास कॅडिलाला नव्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, आरोपांवर लेखी उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, अशी हमी एफडीएने दिली.

आयुर्वेदिक कंपन्यावरही कारवाई, पुण्यातील 3 कंपन्या कायमच्या बंद

महाराष्ट्रातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. राज्यभरातील तब्बल 434 आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीत गंभीर त्रुटी आढळल्याने पुणे जिल्ह्यातील तीन कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची तपासणी केली या तपासणी त्रुटी आढळल्या. बारामतीतील कृष्णा हर्बल, पुण्यातील कालिदास गांधी आणि जेजुरीतील इंडू केअर फार्मा या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *