सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (रेशन) मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या धान्यामुळे त्रस्त झालेल्या लाभार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक चिखली येथे पाहायला (Buldhana News) मिळाला. रेशन दुकानातून मिळालेला अत्यंत निकृष्ट दर्जाचा तांदूळ हातात घेऊन संतप्त लाभार्थ्यांनी थेट चिखली तहसील कार्यालयात धाव घेतली आणि तहसीलदारांच्या दालनासमोरच तो ओतून प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला. “या तांदळाची खिचडी (Buldhana News) तहसीलदारांनी त्यांच्या बायका-पोरांसोबत खावी, मग आम्हीसुद्धा खाऊ! आमच्या घरची कोंबडीसुद्धा हा तांदूळ खात नाही,” अशा अत्यंत तिखट शब्दांत लाभार्थ्यांनी आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनामुळे महसूल आणि पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(Buldhana News)
Buldhana News: “माणसांना जनावरं समजता का?”, लाभार्थ्यांचा थेट सवाल
बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांतून वितरित होणारे धान्य खाण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून होत आहेत. चिखली शहरातील काही कुटुंबांना मिळालेला तांदूळ किडलेला, खराब आणि चुरियुक्त असल्याने संतप्त नागरिकांनी थेट तहसीलदारांचे दालन गाठले. धान्य हातात दाखवत लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांना सवाल केला, “अधिकारी लोक, त्यांच्या मुला-बाळांना आणि बायकोला हे धान्य खायला देतात का? ते या धान्याची वाट पाहतात का? जे धान्य जनावरे आणि कोंबड्याही खात नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का?”(Buldhana News)
Buldhana News: मक्याच्या वाटपावरही उठवले बोट
तांदळासोबतच रेशनवर मिळणाऱ्या मक्याच्या वाटपावरही लाभार्थ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. “तुम्ही मक्याचं वाटप का करताय? माणसांना जनावरं समजून देताय का? आपल्या देशात रोज मक्याची भाकरी किंवा जेवण कोण करतं? खायच्या लायक धान्य देऊ शकत नसाल तर ते वाटपच बंद करा आणि तुमचा मोठेपणा बंद करून ठेवा,” असा थेट इशारा महिला लाभार्थ्यांनी दिला.
Buldhana News: तहसीलदारांना सहकुटुंब जेवणाचे आमंत्रण
आंदोलनकर्त्या लाभार्थ्यांनी तहसीलदारांना अनोखे आव्हान देत म्हटले, “माझ्याकडून तहसीलदार साहेबांना सहकुटुंब जेवणाचे आमंत्रण आहे. त्यांनी माझ्या घरी यावे, मी याच तांदळाची खिचडी त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला प्रेमाने खाऊ घालतो.” चिखली तहसील कार्यालयासमोर घडलेल्या या प्रकारामुळे शासकीय अधिकारी आणि पुरवठा विभागासमोर खळबळ उडाली. प्रशासनाने या निकृष्ट धान्याची तात्काळ दखल घेऊन दोषींवर व रेशन दुकानदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
