अमित शाह उद्या पुण्यात चालले आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराचं प्रदान त्यांच्या हस्ते होणार आहे. लोकमान्य टिळक यांच्यासारखा स्वातंत्र्यलढ्यातील कर्ता पुरुष, ज्यांनी स्वाभिमानाने, अभिमानाने, शौर्याने ईस्ट इंडिया कंपनीशी दोन हात केले, तुरुंगवास भोगला त्यांच्या नावाचा पुरस्कार सध्याच्या ईस्ट इंडिया कंपनीने व्यवस्थापकीय संचालक अमित शाह यांच्या हस्ते देण्याचा घाट घाटला ज्यांनी घातला आहे त्यांच्या बुद्धीची किव येते अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
“पुणेकर विरोध करणार असून त्यांचं अभिनंदन करतो. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असून ही साम्राज्यशाही आहे. अमित शाह यांचे हात रक्ताने बरबटले आहेत, त्यांच्या अंगावर रक्ताचे, अश्रूचे शिंतोडे पडले आहेत आणि महान जहाल लोकमान्य टिळकांच्या नावे असलेला पुरस्कार त्यांच्या हाते देण्याचा घाट घातला आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
“लोकमान्य टिळकांचे वंशज जे शिंदे गटात आहेत त्यांनी यात राजकारण आणू नका असं सांगितलं आहे. मग अमित शाह कोण आहेत? अमित शाह काय बाबा आमटे आहेत का? नैतिकदृष्ट्या हे अध:पतन आहे. टिळकांच्या नावे असलेला बाजार पुणेकर जनता माफ करणार नाही. योग्य व्यक्ती गृहमंत्री असती तर स्वागत केलं असतं. पण जंतर मंतरवर हुकूमशाही विरुद्ध लढणाऱ्या विद्यार्थ्यांना ठेचून मारण्याचा प्रयत्न झाला ते आदेश अमित शाहांचे होते. आणि हा पुरस्कार हे सगळं घडत असताना गप्प राहिले त्या डोवाल यांना दिला जातो. हे कसले पुरस्कार?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, “आम्ही टिळकभक्त आहोत. आम्ही पुणेकरांच्या भावना व्यक्त केल्या. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल याच्या परंपरेला मानणारे आम्ही आहोत. टिळकांचा जहालपणा आम्ही आमच्या लेखणीतून, वाणीतून सातत्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे टिळकांबद्दल भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार आमच्यासारख्या लाखो तरुण, नेत्यांना आहे”.
