मुंबई-पुणे मार्गावरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाच उद्घाटन होऊन अवघे दोन महिने उलटले असतानाच या मार्गावरील कामाच्या गुणवत्तेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाचा दावा करत महायुती सरकारने 1 मे रोजी मोठ्या थाटात उदघाटन करत या महत्वाकांक्षी प्रकल्प जनतेसाठी खुला केला. मात्र पहिल्याच पावसानं या रस्तावर खड्ड्यांचे (Missing Link Potholes) साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे. तर विरोधकांकडूनही टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत स्पष्टीकरण देत प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis on Missing Link Potholes)
मिसिंग लिंकवर खड्डे पडलेत, कनेक्टरजवळ दोन खड्डे पडलेत, बाकी कुठेही खड्डे नाहीत. मात्र काही लोकांना आनंद आहे की, कुठल्याही गोष्टीला खूप मोठं करायचं. कुठलंही काम झाल्यावर आणि पहिला पाऊस झाल्यावर दुसरी लेयर येते. त्या पावसामध्ये रस्त्याची टिकण्याची क्षमता टेस्ट करण्यात येत आणि काय अडचणी येतील, ते टेस्ट करत असतो. परिणामी, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ त्यामुळे हरकत नाही, एमएसआरडीसी योग्य काळजी घेईल. अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: आपण पहिल्यांदा हे करुन दाखवलंय, त्यामुळे निव्वळ टीका करणं योग्य नाही
नवीन उड्डाणपुल केल्यावर त्याठिकाणी मास्टिक एस्फाल्ट सुरुवातीला जमा होते. त्यानंतर योग्य पद्दतीने चालते. केलेलं काम सेटल करावे लागते, या इंजिनिअरिंगच्या गोष्टी आहेत. कुठे काही कमतरता असतील तर दूर करता येतील. पण देशातील सर्वात उंच पूल, देशातील सर्वात रुंद बोगदे, डॅमच्या खाली बोगदा हे पहिल्यांदा आपण करुन दाखवलंय. त्यामुळे निव्वळ टीका करणं योग्य नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis on Mumbai Rain: पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईकरांची चिंता वाढण्याची शक्यता
मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पहाटेपासून ठराविक अंतराने पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबई आणि पालघर जिल्ह्याला पुढील काही तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट असून या भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर वसई आणि विरार परिसरातही सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. नालासोपारा परिसरातही कंबरेइतके पाणी साचले आहे. समुद्राला दुपारी दोनच्या सुमारास भरती आली आहे. त्यामुळे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईकरांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
