Headlines

Uddhav Thackeray: राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; 5 जुलैला दादरमध्ये ‘रामरक्षा’ आंदोलन, उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं!

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील (Ayodhya Ram Mandir) दानपेटी आणि देणगी निधीच्या कथित अपहाराच्या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत एक जाहीर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) अत्यंत आक्रमक शब्दांत जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिराच्या निधीवर भाजपने दरोडा टाकल्याचा थेट आरोप करत उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात थेट रणशिंग फुंकले आहे. या लुटीचा जाब विचारण्यासाठी येत्या रविवारी (दि. 5 जुलै) दादर येथील हनुमान मंदिराजवळ भव्य ‘रामरक्षा’ आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे; पण भारतीय जनता पक्षाचे मूळ जे आहे, ते ज्या आंदोलनातून उभे राहिले, त्यात देशातील तमाम हिंदू सहभागी होता. तो काळ आजही आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. आपल्या माध्यमातून ती सारी दृश्ये जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहेत. कारसेवकांवर झालेले अत्याचार, गोध्राचे हत्याकांड, अहमदाबादमधली दंगल आणि अगदी मुंबईमध्ये सुद्धा जे काही घडले होते, त्याच्यामध्ये हिंदूंनी बरंच काही सोसलं होतं. त्या सगळ्यावर मी असं म्हणेन की, भांडवल करून भारतीय जनता पक्ष  जो हे आंदोलन सुरू होण्याच्या आधी संपूर्ण देशामध्ये त्याचे फक्त दोनच खासदार होते आणि ‘गांधीवादी समाजवाद’ हा त्यांनी अंगी कारलेला एक कार्यक्रम होता, तो कार्यक्रम सोडून ते हिंदुत्वाकडे वळले, राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला.”

Uddhav Thackeray: ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का? 

“आज देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काळात राम मंदिराचा मुद्दा वेगळ्या एका गोष्टीमुळे चर्चेला जातोय, हे दुर्दैव आहे. राजकीय पक्ष तोडले जात आहेत, आमदार गोव्यात किंवा इतरत्र पळवले जात आहेत, खरेदी-विक्री होते आहे आणि याला ‘ऑपरेशन’ नाव दिले जाते. मग आता ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मला असं वाटतं की, या सगळ्या बातम्या दाखवल्या जात असतील, नसतील, बातम्या छापून येत असतील नसतील, पण राम मंदिरावरती दरोडा तर टाकला जातोय, टाकला गेलाय; त्याचे पुरावे सुद्धा दिले गेले आहेत, काही जणांचे म्हणणे आहे की चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, हे फार गंभीर आहे,” असा आरोप त्यांनी केला.

Uddhav Thackeray: 5 जुलैला दादरमध्ये ‘रामरक्षा’ आंदोलन

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “जसं एकदा अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की अब हिंदू मार नही खायेगा, तसे मी म्हणतोय की, मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा. जे जे मंदिर लुटत आहेत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो आहोत. येत्या रविवारी पाच तारखेला दादर येथे हनुमान मंदिरासमोर तमाम हिंदूंना मी आमंत्रित करत आहे. पक्ष वगैरे न बघता, जे जे हिंदू आहेत, ज्यांना ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, त्यांनी एकत्र यावे. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील आणि मी तर म्हणेन केवळ शिवसैनिकच नाही, तर ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलेले नाही, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, ते सगळे हिंदू यात येऊ शकतील, त्यांनी यावे. तिथे मग आम्ही ‘रामरक्षा’ आंदोलन करतो आहोत. आम्ही तिथे रामरक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालीसा सुद्धा म्हणू. येथून हा जाहीर कार्यक्रम सुरू होईल,” अशी घोषणा त्यांनी केली आहे.

“यानंतर प्रत्येक ठिकाणी राज्यभर, जिल्ह्यामध्ये, शहरांमध्ये आणि अगदी खेड्यापाड्यात सुद्धा जिथे जिथे राम मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल, तिथे हे सर्व हिंदू, सर्व रामभक्त एकत्र येतील. मी तर म्हणेल आता वारीची सुरुवात होते आहे, अगदी वारकरी सुद्धा या राम मंदिराच्या लुटीविरोधात ज्यांच्या मनात आग आहे, ज्यांच्या मनात राग आहे, ते सगळे एकत्र होऊन या भारतीय जनता पक्षाला याचे उत्तरदायित्व स्वीकारायला लावल्याशिवाय राहणार नाहीत,” असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *