Headlines

रात्री 9 ते सकाळी 8 वाजेपर्यंत…, मुंबई लोकल ट्रेनसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय; थेट विधानसभेतून घोषणा

बईमधील उपनगरीय लोकल ट्रेन सेवेमध्ये गेल्या काही दिवसांत लोकलमध्ये विविध ठिकाणी प्रवाशांवर झालेल्या हल्ला तसेच वाढत्या चेन स्नॅचिंग, पाकीटमारी, मोबाइल चोरी, गर्दुल्यांचा वावर आणि अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महिलांच्या डब्यांसंदर्भात घेण्यात आला असून तातडीने त्याची अंमलबजावणी सुरु होणार असल्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली आहे.

नेमका काय बदल केलाय?

 

मुंबई उपनगरी रेल्वेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रात्री 9 ते सकाळी 8 वाजेपर्यंत महिला डब्यांमध्ये सुरक्षा रक्षक-होमगार्डची नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेमध्ये केली. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सर्वकष आढावा घेण्यासाठी रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांशी संयुक्त उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, असंही कदम यांनी सांगितलं. 23 जून रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास चर्चगेट-नालासोपरा लोकलमधील फर्स्ट क्लास डब्यात मयंक लोहार आणि रोशन सुवर्णा यांच्यात झालेल्या वादामध्ये रोशनने मयंकची हत्या केली होती. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांमध्येही भीतीचं वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सध्या काय केलं जातंय?

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी मुंबई लोकलमधील घटनांसंदर्भात चिंता व्यक्त करत लक्षवेधी मांडली. या चर्चेला उत्तर देताना कदम यांनी सुरक्षित प्रवासाबाबत माहिती दिली. स्थानकांना एकापेक्षा अधिक प्रवेशद्वारे असल्याने प्रत्येकाची तपासणी करणे शक्य नसले, तरी प्लॅटफॉर्म, रेल्वे डबे, अचानक तपासण्या, सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख आणि संशयितांवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात असल्याचा दावा

सध्या 177 रेल्वे स्थानकांमध्ये सुमारे 6900 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून, फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर सुरू आहे. याच्या मदतीने अलीकडील एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या 15 तासांत अटक केल्याचे कदम यांनी नमूद केले.

पोलिसांची संख्या वाढवण्यासाठी करणार प्रयत्न

रेल्वे पोलिसांची मंजूर 4185 पदांपैकी सुमारे 3500 पदे भरली असून, 1520 होमगार्ड, 112 महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान कार्यरत आहेत. मात्र, वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत हे मनुष्यबळ अपुरे असल्याने रेल्वे पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे कदम यांनी सांगिले.

75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात

मुंबईच्या लोकलमधून 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. इतक्या मोठ्य़ा प्रमाणात लोकांवर लक्ष ठेवणं हे अशक्य आहे, असं कदम यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये लोकल ट्रेनच्या सुरक्षेसंदर्भातील निवेदनात म्हटलं होतं. पुढे बोलताना, लोकल ट्रेनच्या स्थानकांवर सीसीटीव्हीचं जाळं पसरवलं आहे. 177 रेल्वे स्टेशन्सवर 6900 सीसीटीव्ही कॅमेरे सक्रीय आहेत. 20 पोलीस स्थानकात 24 तास मॉनिटरिंग सुरु असतं असं ते म्हणाले आहेत. 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करत असताना सर्वांचं स्कॅनिंग करणं अशक्य आहे. जर कोणी संशयित आढळलं तर त्यांचं स्कॅनिंग करतो. रेल्वे डब्याच्या आत असणारे कर्मचारीही स्कॅनिंग करत असतो. सीसीटीव्हीची संख्या आणि गस्त वाढवणं यावर आपण जोर देणार आहोत, असंही कदम यांनी स्पष्ट केलं. 63 ठिकाणांची ओळख पटवली आहे, जिथे जास्त अपघात होतात. तिथे उपाययोजांसाठी प्रयत्न करत आहोत. अपघात झालेल्या लोकांना लवकर मदत मिळावी यासाठी 177 रेल्वे स्थानकावर मेडिकल रूम सुरू करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे असंही कदम यांनी सांगितलं.

हेल्पलाइन कार्यन्वयित

महिलांसोबत अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलिसांनी होमगार्ड घेत असतात. प्रत्येक ट्रेनमध्ये 4 कर्मचारी तैनात असतात. 1512  ही नुकतीच हेल्पलाइन देखील चालू करण्यात आलेली आहे. यावर 1 लाख 56 हजार फोन आले आहेत. 56 हजार प्रवाशांचे 4 कोटी 36 लाख परत मिळवून देण्यात यशस्वी आलो आहोत. 303 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे.  177 आरोपींवर ड्रग्ज, मद्यप्राशन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे अशी माहिती त्यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहात दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *