भिवंडीत इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. भंडारी कंपाउंडमधील गंगाराम वाडी येथील कोहिनूर अपार्टमेंटची बी विंग कोसळली आहे. दुर्घटनेत 9जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या मलब्यात काहीजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. NDRF आणि TDRF च्या पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
ही सुमारे 14 ते 15 वर्षं जुनी चारमजली इमारत होती. यामध्ये एकूण 32 कुटुंबं राहत होती. इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने नोटीस दिली होती. त्यानंतर इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. प्राथमिक माहितीनुसार, एकाच वेळी तीन पिलर तोडण्याचे काम सुरू असताना इमारतीचा तोल गेला आणि ती कोसळली. दुर्घटना घडली तेव्हा तेव्हा अनेकांनी पळून जाऊन जीव वाचवला, तर काही जण आत अडकले.
दुर्घटनेनंतर बचाव पथकाने सळ्या कापून मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी IGM रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढलं त्यांच्यात एका लहान मुलीचाही समावेश आहे. बाहेर काढल्यानंतर तिने सांगितलं की, दुर्घटना घडली तेव्हा तेव्हा तिचे आई-वडील कसेतरी बाहेर पडले, मात्र ती मलब्यात अडकली होती. बचाव पथकाने तिला सुखरूप बाहेर काढले.
सध्या प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मलब्यात 5 पेक्षा जास्त लोक अडकले असण्याची शक्यता असल्याने रेस्क्यू टीम अतिशय काळजीपूर्वक काम करत आहे.
