मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा पदाधिकारी मेळावा सुरु आहे.. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असून ते पदाधिका-यांना मार्गदर्शन करत आहेत. आगामी राजकीय रणनीती आणि ‘ऑपरेशन टायगर’ यांसारख्या विषयांवर ते या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. मेळाव्यात काय म्हणाले राज ठाकरे? सविस्तर जाणून घेऊया.
वाढदिवसाला मोबाईल मध्ये येतो
वाढदिवशी सर्व मोबाईल घेऊन येतात. मी समोर असून मला मोबाईलमधून बघतात. तुम्हाला भेटायचं असतं. मलाही भेटायचं असतं. पण मोबाईलमध्ये येतो, असे राज ठाकरे म्हणाले. पुढच्या वर्षी मी बाहेर जाईन, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.
SIR यादीकडे लक्ष ठेवणे आवश्यक
एसआयरमुळे पश्चिम बंगालमध्ये काय गोंधळ झाला तुम्हाला माहिती आहे. तुमचं यादीकडे बारीक लक्ष असलं पाहिजे. 20 वर्षांपुर्वी माझ्यासोबत आलात. आंदोलन, जनसंपर्क उत्तम करत असता. पण हीदेखील एक प्रक्रिया आहे. फक्त आंदोलन करुन चालणार नाही. ही प्रक्रीया समजून घ्यायला हवी.
पांढऱ्या पट्ट्यांवर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका
महाराजांच्या जिरेटोपावर जैनांचा झेडा. या सर्व गोष्टी जाणिवपूर्वक सुरु आहेत का? तुम्हाला निवडणुकीपूर्वी आंदोलनात गुंतवून ठेवायचंय का? हे पाहा. वर्षानुवर्षे जैन समाज इथे शांततेने वावरतोय. पण काहीजण भाजपच्या वळचळणीला लागलीयत. आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत, असे म्हणतात. मराठी माणसाचं मनगट कधी पाहिलंयत का? उगीच वाद उकरून काढू नका. मला काहीजण भेटायला येणार आहेत. तेव्हा मी बोलेनच. कसल्या पाँढऱ्या पट्ट्या मारताय? धर्माचं अस्तित्व दाखवताय. धर्माचं काम करा. नको त्या भानगडीत कशाला पडताय. मध्ये कबुतरांचा विषय काढला होता. हे सर्व राजकीय पक्षांच्या नादी लागून करतात. अशा गोष्टीत तुम्हाला गुंतवून ठेवतात. दुसरीकडे यांचं काम सुरु असतं.
‘निवडणूक लढण्यात अर्थ नाही’
निवडणुकीला 3 वर्षे आहेत म्हणून गाफील राहु नका. पायाखालून काय सरकून जाईल तुम्हाला कळणार नाही. दुबार मतदारांवर लक्ष ठेवा. सर्व गोष्टींवर तुमचे लक्ष असायला हवे. अन्यथा निवडणुका लढवण्यात काही अर्थ नाही. ज्या प्रकारे राजकारण सुरु आहे, त्यातून हाताला काही लागणार नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नसतं. हेही दूर होतीलच. 60 वर्षे राज्य केलं त्या काँग्रेसची परिस्थिती बघा काय आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
