Headlines

विठुरायाच्या दर्शनासाठी ‘लालपरी’ सज्ज; आषाढी वारीसाठी राज्यभरातून धावणार 5,500 विशेष ST बसेस

आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदाही मोठे नियोजन केले आहे. राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी तब्बल ५ हजार ५०० विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ प्रवास उपलब्ध करून देण्यावर यंदा विशेष भर देण्यात आला आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्याहून अधिक भाविकांनी मागणी केल्यास त्या ठिकाणाहून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बसची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवासी सवलती कायम

विशेष बस सेवांमध्येही शासनाच्या विविध सवलती लागू राहणार आहेत. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार असून, ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनाचा प्रवास अधिक किफायतशीर ठरणार आहे.

मागील वर्षी 21 लाखांहून अधिक भाविकांची ने-आण

गेल्या वर्षी आषाढी यात्रेदरम्यान एसटी महामंडळाने 5,200 विशेष बसेसच्या माध्यमातून सुमारे 21 लाख 95 हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अधिक सक्षम आणि व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा

वारी काळात रात्रंदिवस सेवा बजावणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. या सुविधेचा लाभ सुमारे 13 हजार कर्मचारी घेणार असून, त्यांच्या सेवाभावाबद्दल मंत्री सरनाईक यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलिसांसोबत समन्वय

एकादशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक परतीच्या प्रवासाला निघत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एसटीचे 36 हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा कर्मचारी स्थानिक पोलिस प्रशासनासोबत समन्वय साधून काम करणार आहेत.

पंढरपुरात चार तात्पुरती बस स्थानके

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) या ठिकाणी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. येथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्यभरातील भाविकांनी एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवांचा लाभ घेत विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले आहे. “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून संपूर्ण यात्राकाळात एसटी यंत्रणा अहोरात्र कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *