Headlines

महाराष्ट्रात पावसाची स्थिती चिंताजनक, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना मात्र दिलासा, विजांसह वादळी पावसाचा अलर्ट

ऑगस्टमध्ये कमी पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाला पोषक वातावरण आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपासून कर्नाल, हरदोई पासून तीव्र कमी दाबाचे क्षेत्र दिघा ते इशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. पूर्व झारखंडमधील कमी दाब क्षेत्राच्या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. तर झारखंड आणि बिहार परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असून ते ताशी 18 किमी वेगाने पश्चिम दिशेकडे सरकत आहे. ही प्रणाली झारखंडच्या दाल्तोंगजपासून 30 किमी वायव्येकडे, उत्तर प्रदेशातील चुर्कपासून 90 किमी अग्नेयकडे होती. आज या प्रणालीची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होऊ शकतो.

आज राज्यातील अहिल्यानगर, मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, जळगाव, नाशिक, पुणे, सोलापूर,छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, मुंबई आणि पुण्यात पुढील 4 दिवसांत हवामानात मोठा बदल होणार नाही. येथे दिवसा ऊन आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसतील.

महाराष्ट्रभरातील जिल्ह्यांमधील 1 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीतील पावसाची स्थिती पाहिली, तर एक चिंतेची बाब समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमी पावसाचे भाग हळूहळू वाढत चालले आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीपासून अनेक भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे पूर्वी समाधानकारक स्थितीत असणारे भाग आता हळूहळू तुटीत जात आहेत. मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालना, लातूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *