स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) घेतलेल्या कर्जातील रक्कम अन्यत्र वळवून आणि कंपनीच्या हिशेबात फेरफार करून बँकेची 160.55 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबईत एका कंपनीवर कावराई केली आहे. ईडीने बिलपॉवर लिमिटेड कंपनीशीसंबंधित वेगवेगळ्या ठिकाणावर छापे टाकले. मुंबई, वडोदरा येथील सात निवासी आणि व्यावसायिक ठिकाणांसह कंपनीच्या बँक लॉकरवर ही छापेमारी करण्यात आली. यात 43.90 लाख रुपयांची रोकड आणि 12.20 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच, 27 लाख रुपये जमा असलेली दोन बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्याप्रमाणे या कंपनीशी संबंधित तीन बँक लॉकर सील करण्यात आलेत.
कंपनीने बोगस कंपन्या दाखवून व्यवहार केल्याचे समोर आले
‘एसबीआय’च्या तक्रारीवरून ‘सीबीआय’च्या दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ‘सीबीआय’ने 30 सप्टेंबर 2024 रोजी बिलपॉवर लिमिटेड, कंपनीचे संचालक आणि संबंधित कंपन्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार ‘ईडी’ने तपास सुरू केला आहे. कंपनीने बोगस कंपन्या दाखवून व्यवहार केल्याचे समोर आल्याचा ‘ईडी’चा दावा आहे. या कंपन्यांचा वापर बँकेचे पैसे वळवण्यासाठी आणि पुन्हा त्याच पैशाचा व्यवहार करण्यासाठी (राऊंड ट्रिपिंग) केल्याचा आरोप आहे.
फसवणूक करणाऱ्या कुटुंबाची ओळख पटली
बिलपॉवर लिमिटेड या कंपन्यांच्या नावे ‘लेटर ऑफ क्रेडिट’ (एलसी) काढण्यात आले आणि कथित बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून सादर करण्यात आल्याचे तपासात आढळल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे. त्यानंतर हा निधी चौधरी कुटुंबातील सदस्य किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या नियंत्रणातील विविध संस्थांकडे वळवल्याचा संशय आहे. ट्रान्सफॉर्मर लॅमिनेशन आणि कोअर निर्मितीच्या व्यवसायातील बिलपॉवर लिमिटेडचे व्यवस्थापन राजेंद्रकुमार चौधरी, सुरेशकुमार चौधरी आणि नरेशकुमार चौधरी यांच्याकडे होते.
ईडीने कोणकोणत्या गोष्टी ताब्यात घेतल्या?
बिलपॉवर लिमिटेड कंपनीचे ‘एसबीआय’ सोबत 2005 पासून विविध बँकिंग व्यवहार होते. 18 एप्रिल 2012 रोजी कंपनीचे कर्जखाते ‘एनपीए’ झाले असून त्यावेळी 160.55 कोटी रुपयांची मूळ थकबाकी होती. ‘ईडी’ने केलेल्या छापेमारीत रोख रकमेसह दागिने आणि बँक लॉकर सील केले. मालमत्ता, जमीन, यंत्रसामग्रीशी संबंधित कागदपत्रांसह हिशेबाची पुस्तके, लेजर आणि डिजिटल उपकरणेही यंत्रणेने ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणामध्ये आता ईडीकडून तपास सुरु असून अजून कंपनीने काही आर्थिक गैरव्यवहार केले आहेत का यासंदर्भातील शोध घेतला जात आहे.
