Headlines

‘या’ शहरात मुसळधार पावसाचा धोका; उद्या शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसना सुट्टी

नागपूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने 29 जुलै रोजी सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने (IMD) 28 ते 30 जुलैदरम्यान नागपूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी अवघ्या काही तासांत शहरात १०८ मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले असून, वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

पावसाचा जोर वाढणार 

पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पूरसदृश परिस्थिती, वाहतूक कोंडी आणि इतर आपत्कालीन घटनांचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

कुठे कुठे सुट्टी?

या आदेशानुसार नागपूर शहरासह नागपूर ग्रामीण, हिंगणा, कामठी आणि जिल्ह्यातील इतर सर्व भागांतील सरकारी व खासगी अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस 29 जुलै रोजी बंद राहतील. नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व शैक्षणिक संस्थांनाही हा आदेश लागू राहणार आहे. दरम्यान, नागरिकांनी हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

29 ते 31 जुलैदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर दिसून येणार असून, 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेश भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत तुलनेने कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होणे, पूरसदृश स्थिती निर्माण होणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दरड कोसळण्याचाही धोका असल्याने प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सर्वाधिक प्रभाव पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 29 जुलै रोजी कमी दाबाच्या क्षेत्राचा सर्वाधिक प्रभाव पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. त्यानंतर 30 जुलै रोजी पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात पावसाचा जोर वाढू शकतो. 31 जुलै रोजीही खानदेश आणि घाटमाथ्यावरील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात पाऊस 

दरम्यान, मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात 30 आणि 31 जुलैदरम्यान पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *