Headlines

भुलेश्वरचा राजाच्या आगमन सोहळ्यातील दुर्घटनेनंतर मूर्तीकार गायब, मूर्तीबाबत अनेक धक्कादायक खुलासे, मूर्तीकाराने पहिल्यांदाच…

भुलेश्वर राजाच्या आगमन सोहळ्यादरम्यान मोठी दुर्घटना होऊन दोन भाविकांचा मृत्यू झाला. बाप्पाची मूर्ती मंडपात नेताना अचानक मूर्ती कोसळली आणि मूर्तीखाली दबून दोन जणांचा मूत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. या घटनेनंतर हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत निरनिराळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसंच, मूर्तीकार अनिकेत देसाई यांच्याबाबतीही अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

भुलेश्वर राजाच्या आगमन सोहळ्यातील दुर्घटनेनंतर मूर्तीकार अनिकेत देसाई हे गायब असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर देसाई यांनी 22 फुटी मूर्ती पहिल्यांदाच बनवली होती. त्यामुळं मूर्तीबाबत अधिक चौकशीसाठी पोलीस देसाई यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या चौकशीतून पोलिस तपासाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, मूर्ती वर्तशॉपमधून बाहेर काढण्याआधी ती ओलसर असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळं मूर्तीचे वजन आणखी वाढले असू शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

मूर्ती बाहेर आणतानाच आले विघ्न

भुलेश्वरच्या राजाची मूर्ती वर्कशॉपमधून बाहेर आणतानाच पहिले विघ्न आले. मूर्ती वर्कशॉपमधून बाहेर पडताच वेल्डिंगची समस्या समोर आली होती. त्यामुळे मूर्ती पुन्हा वर्कशॉपमध्ये नेत वेल्डिंगचे काम करत मूर्ती बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर, मंडपापासून काही अंतरावरच मूर्तिमागील वेल्डिंग पूर्ण उखडल्याने ती कोसळून अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांकडून वर्कशॉपचे सीसीटीव्ही तपासण्यात येणार आहेत. पोलिस वर्कशॉप ते आगमन सोहळ्यादरम्यानचा प्रवासाचा तपास करत आहेत. कुठे काय काय झाले? तसेच मिरवणुकीत सहभागी झालेल्यांचेही जबाब नोंदविण्यात येत आहेत

दरम्यान, या दुर्घटनेमागे मूर्ती पूर्णपणे तयार नसल्याचा दावाही केला जात आहे. वृत्तानुसार, मूर्तीकार अनिकेत देसाई यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मूर्ती अद्याप पूर्णपणे सुकली नसल्याचे सांगितले होते. तसंच, वेल्डिंगचे काही काम बाकी असल्याने आणखी काही दिवस मूर्ती नेऊ नका असा सल्लाही दिला होता, अशीही माहिती समोर येतेय. मात्र डेकोरेटरच्या वेळापत्रकामुळं मूर्ती आगमन सोहळ्यासाठी नेण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *