मुंबईत डीजे आणि लेझर लाईटवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. सण आणि उत्सवांमध्ये डीजेच्या वापरावर आणि लेझर लाईटवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी ही घोषणा केली आहे.
मुंबईत डीजे आणि लेझर लाइट्स सारख्या गोष्टींवर बंदी कायम असणार आहे. मागील अनेक वर्षापासून पाळला जाणारा नियम यापुढेही कायम राहणार आहे. मुंबई पोलिसांसोबत झालेल्या गणेशोत्सव समितीच्या बैठकीत यासंदर्भात एकमताने निर्णय झाला होता. आम्ही डीजे आणि लेझर लाइट्स सारख्या बाबींचा वापर करणार नाही अशी गणेशोत्सव मंडळांनी ग्वाही दिल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिली आहे.
नागपुरात डीजेवर बंदी
पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात डिजे बंद करण्याची मागणी जोर धरू लागलीय. डिजेवर बंदी घालण्यावरून पुण्यात वाद सुरू असतानाच तिकडे राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये डीजेवर बंदी घालण्यात आलीय. 1 नोव्हेंबरपर्यंत ही बंदी लागू करण्यात आलीय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं पोलीस आय़ुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी म्हटलंय.
दरम्यान नागपुरातील डीजेबंदीवरून भाजप नेतेच आमनेसामने आलेय.. डीजेच्या दणदणाटाला एकीकडे भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी विरोध केला. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रवीण दटके आणि शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी वेगळी भूमिका घेतलीय. हिंदू सणांच्या काळातच ही बंदी का लावण्यात आली असा सवाल दोघांनीही उपस्थित केलाय.
एकीकडे संदीप जोशी यांनी अगोदरच डीजे मुक्तीकरता जन आंदोलन उभारण्याचा सांगत आवाज उठवला. पोलीस आयुक्तांना फक्त दोन महिन्यांपुरती ही बंदी लागू केलीय. ही बंदी कायमची लागू करावी अशी मागणी करत संदीप जोशी यांनी पोलीस आयुक्तांनी भेट घेतली.. तर दुसरीकडे हिंदू सणाच्या वेळीच हे निर्बंध का? असा सवाल मध्यनागपूरचे भाजप आमदार प्रविण दटके यांनी उपस्थित केलाय..
