व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube ने युजर्सचा अनुभव अधिक पर्सनलाइज्ड करण्यासाठी ‘Custom Feeds’ फीचर रोलआउट केले आहे. आता तुम्हाला नेमके काय पाहायचे आहे, हे फक्त लिहून सांगताच YouTube त्याच प्रकारच्या व्हिडिओंची एक वेगळी फीड तयार करून देईल. यामुळे नवनवीन कंटेंट शोधणे आता पूर्वीपेक्षा खूपच सोपे आणि वेगाने होणार आहे.
कंपनीने आपल्या अधिकृत कम्युनिटी पोस्ट आणि ब्लॉगद्वारे ‘कस्टम फीड्स’ हे नवीन एआय-बेस्ड फीचर लाँच केले आहे. या फीचरमुळे युजर्सना केवळ एक साधा टेक्स्ट प्रॉम्प्ट टाईप करून आपल्या आवडीनुसार संपूर्ण नवीन व्हिडिओ फीड तयार करता येणार आहे.
यूट्यूबचे CEO नील मोहन यांनी या फीचरबद्दल माहिती देताना सांगितले की, “आम्ही युजर्सच्या हातात त्यांच्या होमपेजची किल्ली सोपवत आहोत”.
अल्गोरिदमवर युजर्सचे थेट नियंत्रण
आतापर्यंत YouTube चे होमपेज हे युजर्सच्या आधीच्या वॉच हिस्ट्री आणि कंपनीच्या मुख्य अल्गोरिदमवर आधारित असायचे. मात्र, नवीन ‘Custom Feeds’ मुळे युजर्स त्यांच्या मूड, दिनचर्या किंवा विशिष्ट आवडीनुसार स्वतःचा अल्गोरिदम तयार करू शकतील. YouTube च्या प्रॉडक्ट मॅनेजमेंट विभागाच्या उपाध्यक्षा एमिली मॉक्सले यांनी सांगितले की, युजर्स नेहमीच अल्गोरिदमवर अधिक नियंत्रण मागत होते. या नवीन फीचरमुळे मूळ होमपेजला धक्का न लावता युजर्सना एका स्वतंत्र स्पेसमध्ये प्रयोग करण्याची मुभा मिळाली आहे.
फीचर कसे काम करते?
- YouTube च्या अधिकृत सपोर्ट पेजनुसार, हे फीचर वापरण्यासाठी युजर्सना खालील पायऱ्याफॉलो कराव्या लागतील.
- YouTube ॲप उघडून होम टॅबवर जावे लागेल.
- स्क्रीनच्या वरील बाजूस असलेल्या ‘+’ (Plus) चिन्हावर किंवा ‘Your Custom Feed’ या पर्यायावर टॅप करावे लागेल.
- तेथे दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला हव्या असलेल्या व्हिडिओंचे Prompt लिहावे लागेल. उदाहरणार्थ- “10 मिनिटांपेक्षा कमी वेळेचे योगा क्लासेस” किंवा “संध्याकाळी शांततेसाठी मोठे डॉक्युमेंट्री व्हिडिओ”.
- प्रॉम्प्ट एंटर करताच, यूट्यूबचे लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLM) सेकंदात त्या मूड आणि विषयानुसार एक नवीन पर्सनलाइज्ड व्हिडिओ फीड तयार करतील.
- युजर्स हे फीड्स होम स्क्रीनच्या वरच्या भागात Pin करून ठेवू शकतात, ज्यामुळे वेगवेगळ्या फीड्समध्ये सहज स्विच करता येईल. तसेच, युजर्स कधीही या प्रॉम्प्टमध्ये Edit करून नवीन कंटेंट मिळवू शकतात.
फ्री आणि प्रीमियम युजर्ससाठी मर्यादा
YouTube ने जारी केलेल्या नियमांनुसार, सामान्य युजर्स एका वेळी कमाल 3 कस्टम फीड्स तयार करून सेव्ह ठेवू शकतात. तर YouTube प्रीमियमचे सबस्क्रिप्शन घेतलेल्या युजर्सना एकाच वेळी 8 कस्टम फीड्स सेव्ह ठेवण्याची सुविधा मिळेल.
महत्त्वाचा नियम: जर एखादी कस्टम फीड 30 दिवसांपेक्षा जास्त काळ न वापरल्यास, तो प्रॉम्प्ट आपोआप एक्सपायर होईल आणि ती फीड हटवली जाईल. यानंतर युजर्स नवीन प्रॉम्प्ट लिहून दुसरी फीड तयार करू शकतील.
होम टॅबचे रिडिझाईन
या फीचरसोबतच YouTube ने आपल्या होम स्क्रीनच्या वरच्या बारचे डिझाईन देखील बदलले आहे. जुन्या टॉपिक चिप्स ऐवजी आता तिथे थेट Subscriptions, Live आणि Music चे पर्याय देण्यात आले आहेत, जेणेकरून युजर्सना थेट नेव्हिगेशन करता येईल. मोबाईलमधील हे कस्टम फीड्स युजर्सच्या डेस्कटॉपवरही Auto-sync होतील.
उपलब्धता आणि रोलआउट
YouTube च्या अधिकृत घोषणेनुसार, सध्या हे फीचर प्राथमिक टप्प्यात युनायटेड स्टेट्स (US) मधील युजर्ससाठी इंग्रजी भाषेमध्ये मोबाईल आणि डेस्कटॉपवर रोलआउट केले जात आहे. यासाठी युजर्सचे वय 13 वर्षांपेक्षा जास्त असणे आणि अकाऊंटची सर्च व वॉच हिस्ट्री ऑन असणे बंधनकारक आहे. भारत आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये हे फीचर कधी उपलब्ध होणार, याबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.
