मुंबईतील दादर प्लाझा परिसरात झालेल्या भीषण बेस्ट बस अपघाताने दोन कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. रोजच्या कामासाठी घराबाहेर पडलेल्या दोन तरुणांचे आयुष्य एका क्षणात संपुष्टात आले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. मृतांपैकी एक असलेल्या 23 वर्षीय नियाज अहमद शेख याची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. काही दिवसांतच गावी जाऊन लग्नाच्या तयारीला सुरुवात करायची होती, पण त्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली.
कामावर जाताना झाला मृत्यू
मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला नियाज शेख गेली पाच वर्षे मुंबईत राहत होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो दिवसरात्र मेहनत करत होता. स्विगीमध्ये डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करणारा नियाज नळबाजार परिसरात वास्तव्यास होता. मंगळवारी सकाळीही तो नेहमीप्रमाणे डिलिव्हरीसाठी घराबाहेर पडला होता. मात्र हा त्याचा शेवटचा प्रवास ठरला. दादर प्लाझा परिसरातून जात असताना भरधाव बेस्ट बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
लग्नाचे स्वप्ने अपूर्णच राहिली
नियाजच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तो येत्या 17 जून रोजी गावी जाणार होता. कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती आणि पुढील दोन ते तीन महिन्यांत त्याचा विवाह होणार होता. आयुष्याची नवी सुरुवात करण्याची स्वप्ने तो पाहत होता. मात्र एका क्षणात सर्व काही संपले. घटनेनंतर नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या भावना हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. “घरासाठी, कुटुंबासाठी तो सतत कष्ट करत होता. लग्नाची तयारी सुरू होती. आता आम्ही कोणाकडे पाहायचे?” असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केला.
नेमका कसा झाला अपघात?
प्राथमिक माहितीनुसार, प्लाझा ते काळाकिल्ला मार्गावरील 463 क्रमांकाची बेस्ट बस पहिल्या फेरीसाठी डेपोतून बाहेर पडत होती. बसमध्ये चालक, वाहक आणि बेस्टचे निरीक्षक उपस्थित होते. बस सुरू करताना हँडब्रेक काढल्यानंतर वाहन अचानक वेगाने पुढे सरकल्याचे सांगितले जात आहे. चालकाने ब्रेक व्यवस्थित काम करत नसल्याचा दावा केल्याचीही माहिती समोर आली आहे.
नियंत्रण सुटलेल्या बसने समोरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना आणि वाहनांना धडक दिली. पुढे मोठी दुर्घटना टाळण्यासाठी चालकाने बस प्लाझाच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत नुकसान झाले होते.
दुसरा युवकही गंभीर जखमी
या दुर्घटनेत 24 वर्षीय ऋषभ गुप्ता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋषभ हा एफवाय बीकॉमचा विद्यार्थी असून शिक्षणासोबत इन्स्टा मार्टसाठी डिलिव्हरीचे काम करत होता. अपघाताच्या दिवशी त्याने महाविद्यालयातील असाइनमेंट पूर्ण करून डिलिव्हरीसाठी बाहेर पडला होता. दादर परिसरातून जात असताना बसच्या धडकेत तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागला असून डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कुटुंबीयांनी अपघातानंतर बेस्ट प्रशासनाकडून कोणतीही विचारपूस करण्यात आली नसल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे.
चालकाविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी बस चालक विकास पाडावे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवत पुढील तपास सुरू आहे. अपघातात चालकालाही दुखापत झाली असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बसच्या ब्रेक यंत्रणेत काही तांत्रिक बिघाड होता का, की अन्य कोणत्या कारणामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, याचा तपास पोलीस आणि बेस्ट प्रशासनाकडून केला जात आहे.
एका क्षणात उद्ध्वस्त झाले दोन कुटुंबांचे आयुष्य
रोजच्या धावपळीत कामासाठी घराबाहेर पडलेले दोन तरुण आणि त्यांच्या कुटुंबांचे भविष्य एका भीषण अपघाताने बदलून टाकले. विशेषतः लग्नाच्या उंबरठ्यावर असलेल्या नियाजचा मृत्यू अनेकांना अस्वस्थ करणारा ठरला आहे. काही दिवसांनी नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाचा प्रवास मात्र दादरच्या रस्त्यावरच कायमचा थांबला.
