Headlines

पुण्यातील प्रसिद्ध दिवेघाटाखालून आता धावणार मेट्रो अन् गाड्या, ‘या’ मोठ्या प्रकल्पासाठी सरकार बांधणार बोगदे

पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नियोजित असलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून, सध्या 60 टक्क्यांहून अधिक भूसंपादन पूर्ण झाले आहे. विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी शहरातील विविध भागात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. विमानतळापर्यंत अतिजलद पोहोचता यावे यासाठी सरकारने मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. सरकारने हडपसरपासून पुरंदर विमानतळापर्यंत अंदाजे 10 किमीचा दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हा बोगदा पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटाखालून जाणार आहे.

दिवेघाटाखालून जाणाऱ्या या बोगद्याचे वैशिष्टय म्हणजे बोगद्यातून एका बाजूने मेट्रो तर दुसऱ्या बाजुने वाहन धावणार आहेत. या बोगद्यामुळे भविष्यात पुण्यावरून पुरंदर विमानतळाला काही मिनिटांत पोहोचता येणार आहे. प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून तयार केला जाणार आहे. त्यानुसार यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

लोहगाव विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी आणि पुण्यात आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर बांधण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. तेव्हा पुण्यावरून या विमानतळाला अतिजलद पोहोचता यावे, यासाठी काय करता येईल, यातून दुहेरी बोगद्याची संकल्पना पुढे आली आहे. दुहेरी बोगदे सेवेत दाखल झाल्यास पुणे ते पुरंदर विमानतळ प्रवास काही मिनिटांवर देणार आहे. आराखड्याचे काम महामेट्रोकडून केले जाणार आहे.

प्रकल्प नेमका कुठून सुरू होणार आणि कुठे संपणार, बोगद्याचा मार्ग नेमका कसा असणार आहे, हे आराखडा पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. आराखडा कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर व्यवहार्यता तपासणी आणि आराखड्याच्या कामाला सुरुवात होईल. या कामासाठी सहा ते आठ महिने जाण्याची शक्यता आहे.

पुण्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येत आहे. यासाठी तब्बल तीन हजार एकर जमीन अपेक्षित आहे. तर, सध्या यापैकी 50 टक्के जमीन संपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सात गावांतील 1523 एकर जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमतिपत्रासह प्रतिज्ञापत्रे जिल्हा प्रशासनाकडे दाखल केली आहेत. या जमिनीपोटी आत्तापर्यंत 450 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *