Headlines

घरात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह अन्…; पंजाबी गायकाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

पंजाबी संगीतविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गायक आणि गीतलेखक बलजीत सिंह यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लुधियानातील त्यांच्या घरातून कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घरातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, बलजीत सिंह हे लुधियानातील सुधार पट्टी धालीवाल गावात एकटे राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नव्हता. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना किंवा आसपासच्या लोकांना सुरुवातीला यामागे काही गंभीर कारण असावे, असा अंदाज आला नव्हता.

गुरुवारी, 3 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सुधार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि घराची झडती घेतली.

घरात बेडवर आढळला मृतदेह

पोलिसांना बलजीत सिंह यांचा मृतदेह घरातील बेडवर आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता त्यांचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. साधारण चार ते पाच दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. घराच्या काही भागात रक्ताचे डाग आढळल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी या मृत्यूकडे केवळ नैसर्गिक मृत्यू म्हणून न पाहता हत्या झाली आहे का, या दिशेनेही तपास सुरू केला आहे. मात्र, बलजीत सिंह यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

CCTV फुटेजमधून मिळणार महत्त्वाचे धागेदोरे?

पोलिसांकडून आता घटनास्थळासह आजूबाजूच्या परिसराचीही तपासणी केली जात आहे. परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, बलजीत सिंह यांच्या मृत्यूपूर्वीच्या हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचीही माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे. मृत्यूपूर्वीच्या काही दिवसांत बलजीत सिंह कोणाला भेटले होते, कोणाशी फोनवर बोलले होते आणि त्यांच्या घरी कोणाची ये-जा होती, याचा तपास केला जात आहे. सध्या या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी असून, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासातूनच या घटनेचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.

 आणखी एका गायकाच्या मृत्यूने चिंता वाढली

बलजीत सिंह यांच्या मृत्यूची बातमी समोर येत असतानाच काही दिवसांपूर्वी हरियाणवी गायक अंकित बलियान यांच्या हत्येनेही संगीतविश्व हादरले होते. शामली येथे जिममधून बाहेर पडताना अंकित बलियान यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

देसी अंदाजामुळे मिळाली वेगळी ओळख

बंटीखेड़ा येथील रहिवासी असलेल्या अंकित बलियान यांनी हरियाणवी संगीत, YouTube आणि पॉडकास्टच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या गाण्यांमध्ये ग्रामीण जीवन, तरुणाई, स्थानिक राजकारण, देसी संस्कृती आणि परिसरातील वास्तव यांचे प्रतिबिंब दिसत असे. ‘भारी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान’ या गाण्यामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय ‘112 NE’, ‘गोली के बारूद’, ‘जाट जाटनी’, ‘अगला जनम जाट’, ‘संविधान’, ‘मोदी बरगा रुतबा’, ‘जाट धर्मेंद्र की तरिया’, ‘एक खतोला जेल के भीतर’, ‘वेट’, ‘सिस्टम’ आणि ‘राइफलिन’ यांसारख्या गाण्यांमुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला होता.

बलजीत सिंह यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे आणि अंकित बलियान यांच्या हत्येमुळे स्थानिक संगीतविश्वातील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या बलजीत सिंह प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *