Headlines

महाराष्ट्रातील हवामान बदलणार! ऐन पावसाळ्यात तापमान 50 अंशापर्यंत जाणार, पावसाबाबत मोठी माहिती

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळं घाट माथ्यावर पूरस्थिती निर्माण झाली होती. तर, मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्येही जनजीवन विस्कळीत झाले होते. पालघरमध्ये सूर्यानदीला आलेल्या पुरामुळं अनेकांच्या घरांत पाणी शिरले होते. आठवडाभर झालेल्या पावसाने जुलै महिन्याची सरासरी भरून काढली आहे. मात्र पुढच्या काही दिवसांत पाऊस ब्रेक घेणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा भरपावसात उकाडा जाणवणार आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय झालेल्या मोसमी पावसाने सध्या विश्रांती घेतल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पावसाचा जोर गुरुवारपासून ओसरला असून पुढील काही दिवस काही प्रदेशांतील अपवाद वगळता उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार असून अद्याप पावसाचा कोणताही इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला नाही. काल मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दुपार नंतर उकाड्यात वाढ झाल्याने ऐन पावसाळ्यात उकाडा जाणवतोय.पावसाच्या विश्रांतीमूळे उकाड्यात काही अंशी वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, भारतात सलग नऊ दिवस सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 126 वर्षांतील पाचव्या क्रमांकाचा सर्वात कोरडा जून अनुभवल्यानंतर, पावसाच्या या वाढीमुळे हंगामातील पावसाची स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरालाही जोरदार पावसाचा सामना करावा लागला; काही ठिकाणी तर जुलै महिन्यासाठी अपेक्षित असलेला बहुतांश पाऊस अवघ्या काही दिवसांतच पडला.

पावसाचा जोर ओसरल्याबरोबरच उन्हाचे चटके जाणवायला लागले आहेत. कोकण विभागात पुन्हा एकदा उकाडा सुरु झाला आहे. पावसाने उसंत घेतल्यास तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार, शुक्रवार, 10 जुलैपासून मान्सूनचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी सरकू लागला आहे. हा पट्टा सरकल्यामुळे, पुढील 5 ते 7 दिवस पश्चिमेकडील कोरडे वारे देशाच्या अंतर्गत भागापर्यंत पोहोचू शकतील. कोरड्या वाऱ्यांच्या या आक्रमणामुळे अनेक भागांतील पावसाचा खंड पडेल आणि मान्सूनचा ओघ थांबेल.

या राज्यांत पावसाचा ब्रेक

महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा यांसारख्या ठिकाणी पावसाची शक्यता कमी वर्तवण्यात आली आहे. या भागांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहील मात्र, उष्णता आणि हवेतील आर्द्रता यांच्या एकत्रित परिणामामुळे तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचा थोडा काळ खंड पडणे ही सामान्य बाब जरी असली तरी जुलैच्या मध्यावरच असा खंड पडल्यामुळे भातासारख्या नुकत्याच लावलेल्या खरीप पिकांबाबत चिंता निर्माण झाली आहे. कारण या पिकांना सतत ओलाव्याची गरज असते. जुलैअखेर पावसाचा आणखी एक सक्रिय टप्पा होण्याची शक्यता आहे. नागरिकांना येत्या काही दिवसांत प्रचंड उकाडा सहन करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *