राज्यभरात पावसाने हाहाकार घातला असून मुंबईतही (Mumbai) पावसामुळे (Rain) दुर्घटना घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. तर, मुंबईतील पावसाच्या पहिल्याच दिवशी, गेल्या आठवड्यात महापालिकेचा एक अधिकारीच मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा साकीनाका खैरनी रोड येथील मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला असून त्यास वाचविण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.
साकीनाका येथील खैराणी रोड, सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलत असताना एक व्यक्ती पडली. खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचे झाकण उघडे होते. शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री व चप्पल आढळली असून पाण्याचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती वाहून गेल्याची शक्यता आहे. MFB, पोलीस, 108 रुग्णवाहिका व संबंधित विभागाकडून शोधकार्य सुरू आहे. दरम्यान, येथील मॅनहोलमध्ये पडलेला व्यक्ती साधारण 45 वर्षांचा असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून त्यास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अस्लम शेख असं या व्यक्तीचं नाव असून सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
