Headlines

नाशिकच्या अजमेरी बेकरीवर FDA ची धडक कारवाई; 151 किलो निकृष्ट केक आणि कप केकचा साठा जप्त

नाशिकमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अजमेरी बेकरीवर धाड टाकत अन्न व औषध प्रशासनाने तब्बल 151 किलो निकृष्ट केक आणि कप केकचा साठा जप्त केला आहे. भारतनगर, वडाळा रोड परिसरातील बेकरीवर ही कारवाई कऱण्यात आली आहे. एफडीएने बेकरीला व्यवसाय तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावली आहे. जप्त अन्नपदार्थांची किंमत तब्बल 37 हजार 990 रुपये इतकी आहे.

णासुदीच्या काळात फेस्टिव्हल ड्राइव्ह 2026 अंतर्गत एफडीएकडून तपासणी करण्यात आली. यादरम्यान बेकरीत अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले. तसंच आवश्यक परवाना आणि उत्पादन प्रक्रियेबाबतही त्रुटी आढळल्या आहेत. केकचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, बेकरीला व्यवसाय तत्काळ बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

जालन्यातील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित

अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी जालना शहरातील डॉमिनोज पिझ्झा आउटलेटचा अन्न परवाना अन्न आणि औषध प्रशासनाने तात्काळ निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या अचानक तपासणीत स्वच्छता आणि अन्न सुरक्षेशी संबंधित अनेक त्रुटी आढळल्या. निकषांच्या पालनाचे प्रमाण केवळ 63 टक्के असल्याने पुढील आदेशापर्यंत परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.

शाकाहारी आणि मांसाहारी पिझ्झा एकाच ओव्हनमध्ये तसेच एकाच पॅनमध्ये तयार केले जात असल्याचं आढळून आलं. अन्नपदार्थ गरम आणि थंड ठेवण्यासाठी तसेच तापमान नियंत्रणासाठी पुरेशा सुविधा नव्हत्या. कर्मचाऱ्यांकडे एप्रन, हातमोजे आणि डोक्याचे संरक्षण करणारी साधने नसल्याचेही तपासणीत निदर्शनास आले. डिलिव्हरीसाठी वापरल्या जाणाऱ्या दुचाकींवरील बॉक्सवर परवाना क्रमांक नसणे, त्यांची स्वच्छता न राखणे, स्वयंपाकाच्या तेलाची नियमित तपासणी न करणे, कचरा वेळेवर न हटवणे आणि अन्न हाताळणीच्या ठिकाणी पाणी साचून राहणे, अशा त्रुटीही या पाहणीत आढळल्या. परवाना निलंबित असताना या आउटलेटमधून अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण किंवा विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.आदेशाचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा तसेच मानके कायदा 2006 अंतर्गत फौजदारी कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *