मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळे नावारूपाला आलेल्या अंतरवाली सराटीत यापुढे उपोषण, आंदोलन न करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी घेतला आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीतील जरांगेंच्या नेहमीच्या उपोषण स्थळावरील मंडपासह स्टेज हटवण्यात आलं आहे. स्टेजवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील काढून घेण्यात आला आहे. उपोषणस्थळी सध्या केवळ पत्र्याचे शेड कायम ठेवण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना याला दुजोरा दिला आहे.
गेल्या 3 वर्षांपासून मंडप आणि स्टेज एकाच जागी कायम होतं. मात्र यापुढे गावात कोणतंही उपोषण किंवा आंदोलन न करण्याचा निर्णय निश्चित झाल्यानंतर जरांगेंच्या सांगण्यावरूनच मंडप, स्टेज हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 2023 पासून जरांगे यांनी अंतरवालीत अनेकवेळा आमरण उपोषण करत मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा तीव्र करत राज्य सरकारला अक्षरशः जेरीस आणलं होतं. मात्र आता अंतरवालीत जरांगेंचं कोणतंही आंदोलन किंवा उपोषण होणार नसल्यानं यापुढे जरांगे कुठे आंदोलन करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मनोज जरांगे यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, हे अखेरचे आंदोलन निर्णायक अंतरवलीत होईल असे म्हणालो होतो त्यानुसार आता अंतरवालीचे व्यासपीठ काढले आहे. आता अंतरवलीत आंदोलन होणार नाही, स्थगित केलं आहे. मात्र उपोषण करत अंतरवली मधून पाटोद्यात गेलो सरकारने ऐकले नाही तर पुढील आंदोलन पाटोदा पासून पुढे सुरू होईल.
