Headlines

महाराष्ट्राचे शिक्षणसम्राट हरपले, पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल पद्मश्री ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डी.वाय.पाटील यांचे आज निधन झाले. मंगळवारी कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अत्यावस्थ होती. डी. वाय पाटील यांचे आज कोल्हापुरातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

डी.वाय.पाटील यांनी शिक्षणक्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. अनेक शिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, विद्यापीठ आणि संशोधन केंद्राची उभारणी करण्यात डी. वाय.पाटील यांचे योगदान आहे. राजकीय-सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना भारत सरकारने पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.

डी.वाय.पाटील यांचा राजकीय प्रवास देखील प्रेरणादायी आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी 1957 ते 1962 या दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर पद भूषवले. 1967 व 1972 साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. गांधी घराण्याची एकनिष्ठ म्हणून डी वाय पाटील यांची ओळख आहे. तसंच, डॉ.डी. वाय.पाटील यांनी  त्रिपुराचे माजी राज्यपाल म्हणूनही काम पाहिलं आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, या ध्येयाने त्यांनी उभारलेले डी. वाय. पाटील शिक्षण साम्राज्य आज देश-विदेशात विस्तारले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबप या गावातून आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे डॉ. डी. वाय. पाटील हे दूरदृष्टीचे शिक्षण तज्ञ म्हणून ओळखले जात होते. शिक्षण हीच समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे. या विश्वासातून त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, दंतचिकित्सा, व्यवस्थापन, कृषी आणि इतर अनेक क्षेत्रांतील शिक्षणसंस्था उभारल्या. राजकारणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केल्यानंतर त्यांनी त्रिपुरा, बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. सार्वजनिक जीवनातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आल होत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *