मुंबईमध्ये दोन अंतरराष्ट्रीय विमानतळं कार्यन्वयित असतानाच आता चक्क अरबी समुद्रामधून विमानं उड्डाण करणार आहेत. विशेष म्हणजे जागतिक पातळीवरील प्रमुख शहरांच्या धर्तीवर नरिमन पॉइंट येथे विशेष सुविधा उभारण्यात येणार आहे. या सुविधेमुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरुन सी-प्लेनचे उड्डाण होताना दिसणार आहे. खास बाब म्हणजे मुंबईच्या समुद्रात उभारण्यात येणाऱ्या तरंगत्या हॉटेलशी हा सी-प्लेन उड्डाण प्रकल्प जोडला जाणार आहे.
केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला प्रकल्प
नरिमन पॉइंट येथे उभारण्यात येणाऱ्या मरिना नावाच्या प्रकल्पात सी प्लेनही उतरविण्याची सुविधा दिली जाणार आहे. केंद्राच्या पर्यावरण विभागाकडे यासंदर्भातील मंजुरीसाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रस्ताव पाठवला आहे. मरिना प्रकल्पासाठी समुद्रात 35 हजार चौ. मीटर क्षेत्रावर भराव टाकावा लागेल. त्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे.
नेमका काय आहे हा प्रोजेक्ट, त्यात काय काय असणार?
मुंबईत पूर्व किनारपट्टीवर मरिना प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली मुंबई पोर्ट प्राधिकरणाने (एमबीपीए) यापूर्वीच सुरू केल्या आहेत. त्याच प्रोजेक्टशी संलग्न असा हा विमान उड्डाणासंदर्भातील सेवेचा प्रकल्प आहे. मुंबईत पूर्व किनारपट्टीवर मरिना प्रकल्प उभारण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्याच धर्तीवर नरिमन पॉइंट येथे एनसीपीए समोरील समुद्रात मरिना प्रकल्प साकारला जाणार आहे. नरिमन पॉइंटसमोरील खोल समुद्रात उभारण्यात येणाऱ्या तरंगत्या हॉटेलवर जाण्यासाठी या मरिनातून स्पीड बोटी सोडण्यात येणार आहेत. त्या भागात 80 बोटी उभी करण्याची सुविधा असेल, तसेच, या बोटी पार्किंगच्या भागात सी-प्लेनदेखील उतरू शकणार आहेत. प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या रश्मी डेव्हल्पमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राज बाबू प्रधान यांनी, या सी-प्लेनचा वापर समुद्रातील तरंगत्या हॉटेलवर जाण्याबरोबरच राज्यातील अन्य भागांतील पर्यटनस्थळी अथवा सी प्लेन उतरू शकणाऱ्या ठिकाणी जाण्यासाठी करता येईल, अशी माहिती दिली.
पर्यटकांसाठी मोठी इमारत
मरिना प्रकल्पात परदेशी पाहुणे, पर्यटक, सीफेअरर, म्हणजेच जहाजांवर काम करणारे कर्मचारी, खासगी व्यावसायिक यांच्या राहण्याची सुविधा असलेली वन बीएचके ते तीन बीएचके आकाराच्या खोल्या असलेली उच्चभ्रू प्रकारातील इमारत उभारली जाणार आहे. ही इमारत आठ मजल्यांची असेल. त्यासाठी समुद्रात जवळपास भराव टाकावा लागणार आहे. या प्रोजेक्टसाठी केंद्र सरकारने 887 कोटी रुपयांचा निधी डिसेंबर 2025 मध्ये मंजूर केला आहे.
समुद्रात 530 खोल्यांचे हॉटेल
नरिमन पॉइंट येथून समुद्रात दोन नॉटिकल मैल अंतरावर तरंगते सेव्हन स्टार हॉटेल उभारले जाईल. या हॉटेलमध्ये तब्बल 530 खोल्या असतील. तसेच 1530 जण बसू शकतील एवढ्या क्षमतेचे थिएटर असेल.
कोणकोणत्या सुविधा असणार थोडक्यात पाहूयात…
नरिमन पॉइंट येथे मरिना प्रकल्पात बोटी आणि नौकांसाठी खास बंदराची निर्मिती.
80 यॉट पार्किंगची सुविधा
रेस्टारंट, कॅफे,
बँक्वेट
हॉटेल
एक्झिक्युटिव्ह क्लब
यॉट क्लब
हेलिपॅड
प्रदर्शन, आर्ट गॅलरी, शॉपिंग सेंटर
प्रिमियम रिटेल शॉप
