Headlines

‘शपथा आणि शिवबंधन नव्हे, माणुसकीच्या बंधनाने खासदार टिकतात’, भाजपचा ठाकरेंवर निशाणा!

भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना म्हटले की, शपथा किंवा शिवबंधन बांधून आमदार-खासदार टिकत नाहीत. त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीच्या बंधनाची गरज असते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे बंधन राहिले नसल्यामुळेच उबाठा गटातील लोक सातत्याने पक्ष सोडत असल्याचा दावा त्यांनी केला.

संजय राऊत यांनी केलेल्या खरेदी-विक्रीच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना नवनाथ बन म्हणाले की, माणसे पैशाने विकत घेता येत नाहीत. प्रेम आणि विश्वासाने माणसे जोडली जातात. पत्राचाळ प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी राऊतांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर उत्तर द्यावे, अशी मागणी केली.मातोश्रीवरील प्रवेशाबाबत संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर टीका करत नवनाथ बन म्हणाले की, अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांना मातोश्रीत प्रवेश मिळत नसल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे सर्वांना सहज भेटतात, हा दावा हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.

 

ईडी, सीबीआय आणि कोर्ट असूनही तुमच्यासोबत माणसे टिकणार नाहीत

संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना नवनाथ बन यांनी सांगितले की, ईडी किंवा सीबीआयच्या माध्यमातून माणसे तोडता येत नाहीत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर चौकशा झाल्या तरी त्यांनी पक्ष सोडला नाही. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी झाले नाहीत, असे त्यांनी नमूद केले.उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन बैठकींवर टीका करत नवनाथ बन यांनी उबाठा पक्ष पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने चालत असल्याचा टोला लगावला. सरकारपासून पक्षाच्या बैठकींपर्यंत सर्व काही ऑनलाईन होत असल्याने मतदानही सोशल मीडियावरून घ्यावे, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.

ठाकरे गटाला मोठा धक्का, एक चूक अन् मुंबई महापालिकेत सदस्यसंख्येच गणित बदलणार?

उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून कोणी येत नाही, जातही नाही

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नवनाथ बन यांनी म्हटले की, पक्षातील नेते त्यांच्या सांगण्यावरून ना येतात ना जातात. पक्षावर प्रभावी नियंत्रण आणि मजबूत वैचारिक अधिष्ठान आवश्यक असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेलेल्यांची राजकीय हानी होणारच असल्याचा दावा त्यांनी केला.

जोड्याने मारण्याची भाषा राऊतांना शोभत नाही

संजय राऊत यांनी वापरलेल्या जोड्याने मारण्याच्या भाषेवर नवनाथ बन यांनी आक्षेप घेतला. विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमधील पराभवाचा उल्लेख करत त्यांनी जनतेनेच मतरूपी जोडे मारल्याचा टोला लगावला.खंजीर खुपसण्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना नवनाथ बन यांनी 2019 च्या राजकीय घडामोडींचा उल्लेख केला. हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जाऊन काँग्रेससोबत जाणे हेच खरे वैचारिक द्रोह असल्याचा आरोप केला. शिवबंधन आणि शपथांवरून सुरू असलेल्या वादात नवनाथ बन यांनी पुन्हा एकदा प्रेम, आपुलकी आणि माणुसकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. फक्त शपथा घेऊन लोकांना बांधून ठेवता येत नाही, असे ते म्हणाले.

नववीच्या पुस्तकात ‘नृत्यांगनेच्या’ नग्न प्रतिमेवरुन वाद; NCERT यू-टर्न; काय घडलंय नेमकं?

अभिजीत दिपके यांच्यावरील मारहाणीचा भाजपकडून निषेध

अभिजीत दिपके यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत नवनाथ बन यांनी लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार असल्याचे सांगितले. मतभेद असतील तर त्याला लोकशाही मार्गाने उत्तर द्यावे, हिंसाचाराचे समर्थन भारतीय जनता पक्ष कधीही करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *