Headlines

मुंबई हायकोर्टाचा दणका! मारकुट्या नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीनच रद्द, पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा आदेश

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे चालवण्यात येणाऱ्या शास्त्रीनगर रुग्णालयात 6 जुलै रोजी डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेला मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. शनिवारी झालेल्या विशेष सुनावणीत, मुंबई हायकोर्टाने एक महिला डॉक्टरवर हल्ला केल्याच्या आणि इतर दोन पुरुष डॉक्टरांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रेला कल्याण न्यायालयाने दिलेल्या जामिनाला स्थगिती दिली आहे. कोर्टाने रमेश म्हात्रेला पोलिसांसमोर उद्या म्हणजे़च 19 जुलैला 5 वाजेपर्यंत आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला आहे. तसंच डॉक्टरांना प्रस्तावित आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी पालिकेच्या रुग्णालयातील तीन डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक (एकनाथ शिंदे) रमेश म्हात्रे यांना दिलेला जामीन रद्द केला. कल्याण येथील दंडाधिकारी न्यायालयाने म्हात्रे यांना जामीन मंजूर करण्याच्या दिलेल्या आदेशाची उच्च न्यायालयाने आज स्वतःहून दखल घेतली. विशेष म्हणजे, म्हात्रे आणि त्यांच्यासोबतच्या चार साथीदारांना जामीन मिळाल्यानंतर, महाराष्ट्रातील डॉक्टरांनी 22 जुलै रोजी कामावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. या चार साथीदारांवरही डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप होता.

मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम आंखड यांच्या खंडपीठाने, महाराष्ट्रातील, विशेषतः महापालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी 22 जुलै रोजी संपावर जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाची दखल घेतली. खंडपीठाने म्हात्रे आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना दिलेला जामीन रद्द केल्यानंतर डॉक्टरांना आंदोलनाच्या आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *