Headlines

कला केंद्रातील वाद जीवावर बेतला, गर्भवती महिलेला धुळ्याला नेलं, अन् तिच्यावर….; डान्सर महिलेसह चौघांना अटक

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सांस्कृतिक कला केंद्रातील अंतर्गत वादातून गर्भवती महिलेची हत्या करून तिचा मृतदेह धुळे जिल्ह्यातील गरताड बारीजवळ डोंगराळ भागात जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  पिंकी हनुमंत काटकर (31) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात सहा जण आरोपी असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे, तर दोघांचा शोध सुरू आहे.

धुळे-सोलापूर महामार्गावरील गरताड बारीजवळ जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर मोहाडी पोलिसांना मृतदेहाजवळ ज्वलनशील पदार्थाची बाटलीही आढळली. महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेज तपासताना संशयित कारचा माग काढण्यात आला.

वाहन जामखेडहून आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस पथकाने जामखेड येथील कला केंद्रात कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींनी मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह जाळल्याचे तपासात समोर आले. या घटनेमागे आणखी काही आरोपी आहेत का याचा शोध आता मोहाडी पोलीस करीत आहे

पोलिसांनी कारवाई करत सर्फराज उर्फ शफीक अलीम मोमीन, आरीफ उर्फ खुज्या आसीफ शेख, स्वाती उर्फ आरती गणेश कुऱ्हाडे, लक्ष्मी बालाजी पवार या चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील इतर दोन आरोपी फारुख शेख आणि रोहिणी जाधव हे अद्याप फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

पिंकी हनुमंत काटकर आणि कला केंद्रामध्ये अंतर्गंत वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की त्या वादातून आरोपींनी तिला आधी बीड जिल्ह्यात बेदम मारहाण करुन बेशुद्ध केले. त्यानंतर तिला गाडीत टाकून राजस्थानमध्ये घेऊन जाण्याचा कट रचला होता. पण नंतर ते धुळ्यात थांबले आणि तिथेच आरोपींनी तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळल्याचे समोर आले आहे.

उघडकीस कसं आलं? 

22 सप्टेंबर रोजी पोलिसांनी गरताडबारी परिसरात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचे ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी विविध पातळ्यांवर तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवालात महिला गर्भवती असल्याचे समोर आले. मात्र या अमानुश हत्याकांडात तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटिव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत अवघ्या तीन दिवसांत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *