करोना विषाणू आणि त्याच्या संसर्गाचा कहर जगानं २०२० मध्ये अनुभवला. करोनामुळे लाखो लोकांनी जीव गमावला. संपूर्ण जगानं लॉकडाऊन पाहिला. या कटू आठवणी आजही ताज्या असताना कोविडचा नवा व्हेरिएंट PJ.2.1 चर्चा आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाचा इशारा दिला आहे. केवळ लक्षणांच्या आधारे संसर्ग नेमका कोविडचा आहे की फ्लूचा आहे की अन्य विषाणूचा आहे, हे सांगणं अवघड असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. त्यामुळे गरज भासल्यास तपासणी करणं आवश्यक ठरू शकतं.
कोविड च्या जुन्या व्हेरिएंटमध्ये काही लक्षणं सामान्य फ्लूपेक्षा वेगळे होती. पण आता घशात खवखव, खोकला, सर्दी आणि अनेक दिवस राहणारा थकवा कोविड आहे की सामान्य फ्लू हे ओळखणं चाचणी केल्याशिवाय अवघड असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. कोविड-१९ चा नवा व्हेरिएंट PJ.2.1 ची लक्षणं सामान्य सर्दी-ताप आणि फ्लूशी मिळतीजुळती आहेत.
कोविड व्हेरिएंट PJ.2.1 म्हणजे नेमकं काय?
PJ.2.1 कोविड विषाणूचा एक नवा स्ट्रेन आहे. याच वर्षी जूनमध्ये अमेरिकेत या स्ट्रेनचे रुग्ण सापडले होते. आता या व्हेरिएंटबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाची माहिती दिली आहे. PJ.2.1 ची लागण झाल्यावर घशात तीव्र वेदना होतात. संसर्ग संपुष्टात आल्यावरही थकवा दिर्घकाळ राहतो. रशियाच्या संसर्ग रोग तज्ज्ञ आणि वायरोलॉजिस्ट एलेना मालिनिकोवा यांनी या लक्षणांचा उल्लेख केला आहे. हा व्हेरिएंट धोकादायक नसून याची बहुतांश लक्षणं फ्लू सारखीच असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.
मे महिन्यात कॅनडात PJ.2.1 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्रायल, फ्रान्स, स्पेन आणि जगाच्या अनेक भागांमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण सापडले. ताप, घशात खवखव, खोकला, सर्दी, नाक बंद होणं, डोकेदुखी आणि अंगदुखी ही PJ.2.1 व्हेरिएंटची लक्षणं आहेत.
कोणाला अधिक धोका?
वृद्ध, रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्ती आणि आधीपासूनच गंभीर आजारांचा सामना करत असलेले रुग्णांना PJ.2.1 व्हेरिएंटचा अधिक धोका आबे. अशांनी श्वासाशी संबंधित संसर्गांकडे दुर्लक्ष करू नये. ताप, सततचा खोकला आणि घशात वेदना होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
