Headlines

Ek Hota Malin Marathi Movie: 12 वर्षांखाली गाडलं गेलेलं गाव अन्…; थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार मोठ्या पडद्यावर, कधी होणार रिलीज?

पुणे जिल्ह्यातील (Pune District) आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) माळीण (Malin) गावात 30 जुलै 2014 रोजी दरड कोसळल्याची दुर्घटना (Landslide Incident) घडली होती. या दुर्घटनेत 150 पेक्षा अधिक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता तर शेकडोजण जखमी झाले होते. याच ​दुर्घटनेवर आधारित काळजाचा थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार आता ‘एक होतं माळीण’ (Ek Hota Malin Marathi Movie) या चित्रपटातून येत्या 24 जुलैला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, माळीण गावाचा भव्य सेट आणि दमदार संहिता हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर व मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर रुपेश राणे, अरूण  कोंजे, दत्ता गायकर, राजु राणे हे सहनिर्माते आहेत. रॅन स्टुडिओज प्रोडक्शन चे नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे व राजु राणे  यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजु राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजु राणे यांनी चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक, अनुज ठाकरे  अशा उत्तम कलावंतांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी छायांकन, युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं असून अजय गोगावले, जावेद अली,आनंदी जोशी व हरिदास शिंदे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. कला नितेश नांदगावकर, व्हीएफएक्स रहमान अब्दुल्ला यांचे असून महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत.

मुसळधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे जीवित आणि मालमत्तेची हानी झाली होती. एक संपूर्ण गावच त्या सकाळी नाहीसं झालं होतं. या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एक हृदयस्पर्शी आणि थरारक अनुभव प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. उत्तम संहिता, दमदार कलाकार आणि उत्कृष्ट व्हीएफएक्स आणि संगीत ही या चित्रपटाची बलस्थानं आहेत. मराठी चित्रपटात उत्तमोत्तम कथा असलेले चित्रपट येत असतात. त्यात आता ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाचीही भर पडणार आहे. विशेष म्हणजे राजु राणे यांनी या चित्रपटासाठी माळीणमधील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून योग्य माहिती घेऊन कथानक लिहिलं गेलं आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि नव्या दमाच्या टीमने मोठ्या मेहनतीनं हा चित्रपट साकारला असून आता 24 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *