Headlines

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा, मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा-पाऊण तासाने उशिरा

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे. सकाळी गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळं मुलुंड ते ठाणे दरम्यान लोकल उशिराने धावत असून वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने आहे. दरम्यान, रेल्वेच्या या गोंधळामुळं प्रवासी रेल्वे रुळांवरुन चालत निघाले आहेत. तसंच, स्थानकातही मोठी गर्दी झाली आहे.

सोमवारी सकाळी मुलुंड ते ठाणे रेल्वे स्थानकाच्या दरम्याव ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलचा खोळंबा झाला होता. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.23 वाजता डाउन मार्गावर एक तार लटकताना दिसली होती. त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव लोकलचा वेग मंदावण्यात आला. त्यामुळं मेन लाइनवर लोकल उशिराने धावत आहेत.

दरम्यान, आता हाती आलेल्या माहितीनुसार, मध्ये रेल्वेची वाहतूक पुन्हा दुपारी 12च्या सुमारास विस्कळीत झाली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाहतूक धिम्या गतीने धावत आहे. मुलुंड ते ठाणे आणि कांजूर ते भांडुप अशा दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे सांगितले जातेय.
बिघाडामुळे अप आणि डाउन जलद तसेच धीम्या मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्या आहेत. तसंच, मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते पाउण तासाने उशिराने आहे.

सोमवारी सकाळीच लोकलचा खोळंबा झाल्याने लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारवर्गाला लेट मार्क लागणार आहे. तसंच, ठाणे स्थानकातही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळतेच. ऐन गर्दीच्या वेळी लोकलची वाहतूक विस्कळीत झाल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *