कराड तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. नदीतील पाण्याचा रंग अचानक हिरवा झाल्याने नागरिक घाबरले असून, प्रशासनाचीही धावपळ सुरु आहे. पाणी दूषित झाले असून या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. कराड तालुक्यातील सुमारे दहा गावांतील 500 हून अधिक नागरिक आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या पाण्याचे नमुने तपासल्यानंतर ते पिण्यास अयोग्य असल्याचं स्पष्ट करत नागरिकांना हे पाणी पिण्यास किंवा घरगुती वापरासाठी वापरू नये, असं आवाहन केलं आहे. दरम्यान नेमकं प्रदूषण कशामुळे झालं याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. या नदीचा आजूबाजूला असणाऱ्या गावांसाठी नवीन पाण्याचे स्रोत शोधण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाचा वतीने देण्यात आले आहेत.
कृष्णा नदीतून पाणी उपशावर बंदी
मान्सून लांबल्याने,कृष्णा नदी काठावर पाणी टंचाईचे ढग आहेत. कृष्णा नदीतून पाणी उपसावर जलसंपदा विभागाकडून बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. शेतीसाठी पाणी उपसा करण्यावरीस बंदी लागू झाली आहे. खासगी व औद्योगिक पाणी उपशावर देखील बंदी घालण्यात आली आहे. पाणी उपसा केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी उपसा करण्याला परवानगी आहे.
कोयना धरणातील कमी झालेले पाणीसाठा आणि नदीतील पाण्याची उपलब्धता यामुळे जलसंपदा विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला. 15 जूनपासून पुढील आदेशपर्यंत कृष्णा नदीतील शेती व इतर गोष्टीसाठी पाणी उपशावर बंदी राहणार आहे.
धरणांतील पाणी तीन महिने फक्त पिण्यासाठी
अपुऱ्या पर्जन्यमानाचा अंदाज आणि पाणीटंचाई यांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. राज्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा पुढील तीन महिने फक्त पिण्यासाठीच वापरला जावा, सिंचनासाठी धरणातील पाणी सोडणे बंद करा, असे निर्देश शासनाने दिले आहेत. बरोबरच बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
