नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पट्ट्यात मंगळवारी ढगफुटीचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळं जिल्ह्यात आज हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र नाशिककरांवरचे संकट सध्या तरी टळले आहे. त्र्यंबकेश्वर-नाशिकमार्गे जाण्याची शक्यता असलेली ढगफुटी सुरतकडे आणि दक्षिण दिशेला सरकली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसे असले तरी पर्यटनस्थळावरील निर्बंध कायम आहेत. तसंच, ऑरेंज अलर्ट कायम असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये मध्यरात्री ढगफुटीचा अलर्ट देण्यात आला होता. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणाही सज्ज होती. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कुठेही ढगफुटी होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, आता हे संकट टळलेले आहे. असे असले तरी नाशिकमध्ये पाऊस सुरूच आहे. नाशिक घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, एकूण परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.
नाशिकवरील ढगफुटीचा धोका तूर्तास टळला आहे, ढग अहिल्यानगर, सुरतच्या दिशेने वळल्याची माहिती समोर येतेय. गेल्या 24 तासात पालघरमध्ये सुमारे 450 मिमी पाऊस पाडणारा भोवरा ( Vortex) आता उत्तर दिशेला सरकला आहे. त्र्यंबकेश्वर-नाशिकमार्गे जाण्याची शक्यता असलेली ढगफुटी सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराकडे सरकल्याचे दिसून आले आहे. भोवरा अकोल्याच्या दिशेने सरकल्याने येथे मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
ढगफुटीचा धोका टळला असला तरी नाशिक घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, एकूण परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, नाशिक जिल्ह्यात कुठलीही आपत्कालीन परिस्थिती नाही.
नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद
अकोले – नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून भंडारदरा परिसरातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. सततचा मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. संधन व्हॅली , कोकणकडा, रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई शिखर ही पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. रिव्हर्स वॉटरफॉलसह सर्व साहसी पर्यटन उपक्रमांवरही तात्पुरती बंदी आणण्यात आली आहे.
