नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि पिकअप व्हॅनची धडक होऊन हा अपघात झाला. अपघात इतका जबर होता की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसंच चार जण जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर काही काळासाठी वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. अपघातानंतर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांना सुरळीत केली. तसंच जेसेबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यावरुन बाजूला नेलं.
नांदेमध्येही असाच अपघात! ट्रक आणि प्रवासी ऑटोच्या भीषण अपघातात 8 ठार
याआधी गुरुवारी नांदेडमध्येही असाच अपघात झाला आहे. ट्रक आणि प्रवासी टाटा मॅजिक ऑटोची समोरासमोर भीषण घडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार तर 7 जण गंभीर जखमी झाले. नांदेड भोकर रोडवरील सीताखंडी घाटात काल सायंकाळी हा अपघात घडला.
भोकर कडून नांदेडकडे जाणारा भरधाव ट्रक आणि प्रवासी टाटा मॅजिक यांचा सीताखंडी घाटात अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की प्रवासी ऑटो रस्त्याच्या बाजूला दूरवर फेकला गेला तर ट्रक चालक अपघातानंतर ट्रकमध्ये अडकून पडला होता. जेसीबीच्या साहाय्याने ट्रकचा पत्रा काढत चालकाला बाहेर काढण्यात आले. जखमींना भोकर आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान रात्री उशीरा खासदार अशोक चव्हाण यांनी भोकरच्या रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली.
