1 ऑक्टोबर 2026 पासून WhatsApp Business Platform वापरणाऱ्या व्यवसायांना काही प्रकारच्या मेसेजसाठी शुल्क द्यावे लागणार आहे. Meta ने आतापर्यंत मोफत असलेल्या काही Service Messages साठी आता प्रति-मेसेज शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाचा परिणाम ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी WhatsApp Business Platform वापरणाऱ्या व्यवसायांवर होईल.
Meta च्या मते, Service Messages साठी आकारले जाणारे दर संबंधित देशातील Utility आणि Authentication Messages यांच्या दरांप्रमाणे असतील.
व्यवसायांना काय करावे लागेल?
WhatsApp Business Platform वापरणाऱ्या व्यवसायांनी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पेमेंट पद्धत (payment method) जोडणे आवश्यक आहे. तसे न केल्यास 1 ऑक्टोबरपासून त्यांचे Service Messages ग्राहकांपर्यंत पोहोचवणे Meta थांबवू शकते.
Service Messages म्हणजे काय?
ग्राहकाने व्यवसायाशी संपर्क साधल्यानंतर सुरू होणाऱ्या 24 तासांच्या Customer Service Window मध्ये व्यवसायाकडून पाठवले जाणारे, टेम्पलेट नसलेले प्रतिसाद म्हणजे Service Messages. हे संदेश मानवी ग्राहक सेवा प्रतिनिधी किंवा तृतीय-पक्ष AI प्रणालीच्या मदतीने पाठवले जाऊ शकतात.
1 ऑक्टोबरपासून अशा संदेशांवरही शुल्क आकारले जाईल. याशिवाय, ग्राहकाने सुरू केलेल्या 24 तासांच्या विंडोमध्ये पाठवले जाणारे काही Utility Messages देखील आता सशुल्क होतील.
भारतातील शुल्क किती?
Meta च्या माहितीनुसार, भारतात Service Messages साठीचे दर Utility आणि Authentication Messages प्रमाणे असतील. भारतातील Meta Business Agent खात्यांसाठी बिलिंग भारतीय रुपयांमध्ये केले जाईल आणि जागतिक दर संदेश वितरित होताना लागू असलेल्या दैनंदिन विनिमय दरानुसार रुपयांत रूपांतरित केला जाईल.
Meta Business Agent द्वारे पाठवले जाणारे संदेश आधीपासूनच सशुल्क आहेत. 1 ऑगस्टपासून त्यांच्यासाठी टोकनच्या आधारे शुल्क आकारले जाते. Meta च्या जागतिक दरानुसार 10 लाख टोकनसाठी 2 डॉलर शुल्क आहे. साधारण संदेशासाठी 20,000 ते 25,000 टोकन वापरले जाऊ शकतात, त्यामुळे त्याचा खर्च अंदाजे 4 ते 5 सेंट इतका होऊ शकतो. अधिक गुंतागुंतीच्या संवादासाठी टोकनचा वापर आणि खर्च वाढू शकतो.
1 ऑक्टोबरपासून नेमका काय बदल होईल?
1 ऑक्टोबरनंतर व्यवसायाकडून पाठवला जाणारा प्रत्येक Non-template Message दोनपैकी एका प्रकारात येईल. Service Message: मानवी प्रतिनिधी किंवा तृतीय-पक्ष AI प्रणालीने दिलेला प्रतिसाद; यासाठी प्रति मेसेज शुल्क असेल. Meta Business Agent Message: Meta च्या AI Agent द्वारे दिलेला प्रतिसाद; यासाठी टोकनच्या आधारे स्वतंत्र शुल्क असेल. Meta ने स्पष्ट केले आहे की एकाच मेसेजसाठी व्यवसायाकडून दुहेरी शुल्क आकारले जाणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्या संभाषणात एक Marketing Message, दोन Meta Business Agent Responses, एक Service Response आणि एक Utility Message असल्यास नव्या दररचनेनुसार एकूण पाच शुल्क लागू होऊ शकतात. पूर्वी याच उदाहरणात फक्त Marketing Message सशुल्क होता.
सामान्य WhatsApp वापरकर्त्यांवर काय परिणाम?
हा बदल मुख्यतः WhatsApp Business Platform वापरणाऱ्या व्यवसायांसाठी आहे. त्यामुळे मित्र, कुटुंबीय किंवा इतर सामान्य वापरकर्त्यांना WhatsApp वर नेहमीचे वैयक्तिक मेसेज पाठवण्यासाठी शुल्क आकारले जाणार असल्याचे या वृत्तात सांगितलेले नाही.
ग्राहक एखाद्या जाहिरातीमधून WhatsApp वर येतो आणि त्यानंतर उपलब्ध असलेल्या Free Entry Point Window मध्ये संदेश पाठवले जातात, तर त्या विंडोतील संदेशांच्या डिलिव्हरीसाठीची सध्याची मोफत सुविधा कायम राहणार आहे. मात्र Meta Business Agent संदेशांसाठी AI टोकन शुल्क लागू होऊ शकते.
