आरोग्य विमा म्हणजेच मेडिक्लेम म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. खरं तर आरोग्यविषयक मोठा खर्च आला तर उपयोगी पडावा म्हणून अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांचा मेडिक्लेम काढला जातो. मात्र मेडिक्लेममधून पैसे परत मिळवण्यासाठी अनेक जाचक अटी टाकल्या जातात. यापैकी सर्वात त्रासदायक ठरणारी अट म्हणजे रुग्ण किमान 24 तास रुग्णालयात दाखल झाला पाहिजे. याच अटीमुळे अनेकदा मेडिक्लेमअंतर्गत पैशांसाठी दावा करता येत नाही. मात्र हाच जाचक नियम आता बदलण्यात आला आहे. मेडिक्लेमच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. पारंपारिक नियमांनुसार 24 तास रुग्णालयात दाखल राहण्याची अट आता वगळण्यात आली आहे. अनेक विमा कंपन्यांनी ही 24 तास दाखल राहण्याची अट शिथिल केली आहे. आता केवळ दोन तासांसाठी रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या व्यक्तीलाही मेडिक्लेम मिळू शकतो. बदलण्यात आलेले हे नियम काय आणि याचा लाभ कसा घेता येईल ते समजून घेऊयात…
नियम का बदलण्यात आला?
मेडिक्लेमसंदर्भातील आजपर्यंत वापरण्यात येणारे नियम हे जुन्या वैद्यकीय स्थिती आणि परिस्थितीवर अवलंबून होते. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणांमुळे गंभीर आजारांवरही काही तासांमध्ये उपचार सहज शक्य झाले आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, केमोथेरपी, अँजिओग्राफी, डायलिसिस, छोट्या शस्त्रक्रिया हल्ली काही तासांत पूर्ण होतात. लेझर ट्रीटमेंट आणि इतर आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णाला रात्रभर हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज उरलेली नाही. इन्शुरन्स रेग्युलेट्री अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच आयआरडीएआयने याची दाखल घेत नियम बदलून 24 तास रुग्णालयात दाखल राहण्याची अट शिथिल करण्यास सांगितले आहेत. आयआरडीएआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि वैद्यकीय प्रगतीमुळे 24 तास रुग्णालयात दाखल राहण्याचा नियम बदलण्यात आला आहे.
सरसकट सगळ्यांना लागू नाही
मात्र ही सुविधा सर्व पॉलिसींमध्ये लागू होणार नाही. सर्व कंपन्या एकसारख्या नियम लागू करत नाहीत. काही प्लॅन्समध्ये अजूनही 24 तासांची अट असू शकते. काही विशिष्ट प्लॅन्समध्ये ही 2 तासांमध्ये मेडिक्लेम मिळवण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. उदाहरण द्यायचे झाले तर आयसीआयसीआय लॅम्बार्ड एलिव्हेट प्लॅन, केअर सुप्रीम प्लॅन, निवाह बुपा अरोग्य, अॅस्पायर, रीएश्युअर 2.0 प्लॅनमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. तुमच्या पॉलिसीमध्ये ही अट समाविष्ट आहे का, हे पॉलिसी दस्तऐवजात किंवा कंपनीच्या वेबसाइटवर तपासता येईल. त्यामुळे कोणत्या कंपनीची पॉलिसी अथवा मेडिक्लेम तुमच्याकडे आहे ही एकमेव अट हा लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
कोणाला होणार याचा सर्वाधिक फायदा?
एका दिवसामध्ये इलाज होऊ शकतो असा आरोग्य विषय समस्या असलेल्यांना याचा फार फायदा होणार आहे. खर्चात बचत आणि जलद डिस्चार्ज मिळण्याचा मार्ग या मेडिक्लेममुळे मोकळा होणार आहे. अपघात किंवा छोट्या इमर्जन्सी प्रकरणांमध्ये बदलेला हा नियम फारच उपयुक्त ठरणार आहे. मात्र वैद्यकीयदृष्ट्या रुग्णालयात अवघ्या दोन तासांसाठी का असेना दाखल होणं आवश्यक असणे गरजेचं आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला, उपचार नोंद, डिस्चार्ज समरी आवश्यक करण्यात आली असून हे सारं असेल तरच मेडिक्लेम करता येईल. नेटवर्क हॉस्पिटलमध्येच कॅशलेस क्लेमसाठीचे अर्ज सोयीस्कर ठरतील. यासाठी प्री-अथॉरायझेशन म्हणजेच, आगाऊ परवानगी घेणे अनिवार्य आहे. ओपीडी तपासणी, कॉस्मेटिक उपचार किंवा अनावश्यक दाखल यांना हे विमा कव्हरेज मिळणार नाही.
2 तासांमध्ये कॅशलेस क्लेम सेटल
आयआरडीएआयच्या नियमांनुसार कागदपत्रे पूर्ण असल्यास कॅशलेस क्लेम 30 मिनिट ते 2 तासांत मंजूर होऊ शकतो. उदाहरण सांगायचे झाले तर स्टार हेल्थसारख्या कंपन्या 90 टक्के कॅशलेस क्लेम 2 तासांमध्ये निकालात काढतात.
लाभ मिळवण्यासाठी या गोष्टी आवश्य करा
तुमची पॉलिसीसंदर्भातील तपशील तपासा किंवा एजंट अथवा कंपनीला संपर्क करुन या नव्या बदलांसंदर्भात जाणून घेऊ शकता. तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल होताच प्री-अथॉरायझेशन साठी अर्ज करणं हा लाभ मिळवण्यासाठी फायद्याचं ठरु शकतं. क्लेमसाठी अर्ज करताना आधार, पॉलिसी कॉपी, डॉक्टरांचे पत्र असे सर्व सर्व कागदपत्रं तयार ठेवा. क्लेम नाकारल्यास ‘विमा भरोसा’ पोर्टलवर तक्रार नोंदवता येते. याबद्दलची सारी माहिती तुम्हाला तुमच्या एजंटकडून किंवा ज्या कंपनीची पॉलिसी आहे त्यांच्याकडून मिळेल.
