Headlines

केतन अगरवाल प्रकरण थेट राष्ट्रपती मूर्मूंपर्यंत पोहोचलं; ‘न्याय देण्यात उशीर झाल्यास…’, सियाचाही दिला संदर्भ

संपूर्ण देशभरामध्ये चर्चा असलेल्या केतन अगरवाल प्रकरणासंदर्भात केतनच्या वडिलांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना पत्र लिहिलं आहे. 18 जून रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी लोहगडावरुन धक्का देऊन केतनचा जीव घेतला. केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र स्वरुपात एक भावुक ई-मेल पाठवला आहे. यात त्यांनी आपल्या मुलाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि प्रकरण फास्ट-ट्रॅक कोर्टमध्ये सुनावणीसाठी घ्यावे, अशी मागणी केली आहे. विशाल अगरवाल यांनी राष्ट्रपतींच्या सचिवालयाच्या ई-मेल आयडीवर पाठवलेल्या पत्रात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

सुनावणी फास्ट-ट्रॅक कोर्टमध्ये करा

“वेदना आणि न्याय मिळेल या आशेने मी हा ई-मेल लिहितोय. मी उद्योगपती किंवा प्रभावशाली व्यक्ती म्हणून हे लिहित नाहीये. मी फक्त एक बाप आहे, जो आपल्या मुलासाठी न्याय मागतोय. फक्त 20 दिवसांत मी माझा मुलगा आणि वडील दोघेही गमावले. आमचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. प्रकरणाची सुनावणी फास्ट-ट्रॅक कोर्टमध्ये करावी, जेणेकरून शीघ्र न्याय मिळेल. न्याय देण्यात उशीर झाल्यास कुटुंबाचे दु:ख अधिक वाढेल,” असं विशाल अगरवाल यांनी मूर्मू यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे.

विशेष सवलत नको, फक्त न्याय वेळेत द्या

तसेच, “माझ्या मुलाच्या प्रकरणाला फक्त आणखी एक फाइल बनू देऊ नका. या साऱ्या घडामोडीने प्रभावित झालेल्या आमच्या कुटुंबाने सर्वकाही गमावले आहे,” अशी भावनिक साद विशाल अगरवाल यांनी राष्ट्रपतींना घातली आहे. दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी आपली मागणी असल्याचंही केतनच्या वडिलांनी या ई-मेलमध्ये म्हटलं आहे. आम्हाला कोणत्याही विशेष सवलतीची अपेक्षा नाही, फक्त वेळेवर न्याय हवा आहे असं केतनच्या वडिलांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रामध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

…म्हणून करायचं नव्हतं केतनशी लग्न

केतन आणि सिया यांचे लग्न नोव्हेंबरमध्ये ठरले होते. मात्र सियाला केतन आवडत नव्हता. तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, केतन केसाचा विग लावायचा म्हणून सियाला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. म्हणूनच तिने प्रियकर चेतनच्या मदतीने कट रचून केतनला 18 जून रोजी दुपारच्या सुमारास लोहगडाच्या कड्यावरुन दरीत ढकलून दिलं. त्यानंतर हा अपघात असल्याचा बनाव या दोघांनी रचला. मात्र पोलिसांना संशय आल्याने या प्रकरणामध्ये सखोल चौकशी केली असता सियाने हे तिच्या कथित प्रियकराच्या मदतीने घडवून आणल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी लोहगड येथे या दोघांना वेगवेगळ्या वेळी नेऊन क्राइम सीन रिक्रिएशन केले. दोन्ही आरोपींना 14 दिवसांच्या न्यायिक कोठडीत पाठवण्यात आले असून या कठोडीचे अजून सात दिवस शिल्लक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *