पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागात बुधवारी दुपारी एका तीन मजली इमारतीचा मोठा भाग कोसळला आहे. इमारत कोसळल्याने किमान 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या इमारतीत कचरा प्रक्रिया केंद्राचे प्रशासकीय कार्यालय होतं. मुसळधार पावसामुळे इमारतीशेजारील कचऱ्याचा मोठा ढिगारा सरकल्याने ही इमारत कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील मोशी भागात असलेल्या या घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन मदत यंत्रणांची पथकं तातडीने दाखल झाली आहेत. सध्या तिथे बचावकार्य सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी कोसळलेली इमारत ही ‘वेस्ट-टू-एनर्जी’ (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पाची प्रशासकीय इमारत आहे; या प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ‘अँटोनी लारा रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड’सोबत करार केला होता.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे की, “हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाचा प्रशासकीय विभाग आहे.”
ही इमारत जुना कचरा डेपो किंवा डम्पसाइट्सवर दीर्घकाळापासून पडून असलेला प्रक्रिया न केलेला घनकचरा आणि औद्योगिक उप-उत्पादने ढिगाऱ्यालगत स्थित असल्याचंही ते म्हणाले.
अग्निशमन दल आणि एनडीआरएफला (NDRF) सूचित केले असून, ते घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य हाती घेतलं आहे.
मोशी येथे पोहोचलेले आणखी एक महानगरपालिका अधिकारी किरण गायकवाड म्हणाले, “आम्ही अडकलेल्या कामगारांशी संपर्क साधला आहे. एनडीआरएफ (NDRF) बचावकार्य करत आहे.”
