Headlines

Moshi Building Collapse: ‘एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर…’; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ (Waste-to-Energy) प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली आहे. या भीषण इमारत दुर्घटनेला (Building Collapse) आता तब्बल 43 तास उलटून गेले आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही 8 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, बचावकार्य (Rescue Operation) संथ गतीने सुरू असल्यामुळे घटनास्थळी नातेवाईकांचा तीव्र संताप आणि आक्रोशाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अडकलेल्या कामगारांचे नातेवाईक घटनास्थळी धावून आले आहेत. आपल्या कुटुंबातील माणूस सुखरूप बाहेर यावा म्हणून ते डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत. मात्र, प्रशासनाकडून अत्यंत ढिसाळपणे आणि संथ गतीने काम सुरू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अनधिकृत बांधकाम पाडताना 50 ते 60 पोकलेन आणणारी महापालिका, इथे माणसांचे जीव वाचवण्यासाठी मात्र केवळ 4 पोकलेन आणि एका क्रेनच्या भरवशावर काम करत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. काल रात्री साडेबारा वाजता एका कामगाराला बाहेर काढण्यात आले, तेव्हा त्याने आतमध्ये अडकलेले इतर लोक ‘आई-आई’ म्हणून ओरडत असल्याचे सांगितले. मात्र, तरीही यंत्रणा तातडीने हलली नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

Moshi Building Collapse: आयुक्तांवर गंभीर आरोप

महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी या घटनेला ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून हात वर केले आहेत. मात्र, स्थानिकांनी आणि नातेवाईकांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. जो कचऱ्याचा डोंगर नियमबाह्य पद्धतीने 180 फुटांपर्यंत वाढू दिला, तो महापालिकेचाच मूर्खपणा होता, असा थेट आरोप केला जात आहे. तसेच, शहरातील कचरा गोळा करणारे ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे अधिकारीच या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

या गंभीर दुर्घटनेनंतर शहराचे महापौर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी फिरकून नातेवाईकांची साधी विचारपूसही केली नसल्याने संताप दुणावला आहे. केवळ मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली, परंतु ठोस मदत किंवा वेगवान यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. “एखाद्या नेत्याचा किंवा मंत्र्याचा मुलगा असता, तर यंत्रणा मुंबई-दिल्लीवरून धावली असती, पण गरिबांच्या जिवाची कोणालाच किंमत नाही,” अशा शब्दांत नातेवाईकांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

Moshi Building Collapse: हलगर्जीपणामुळे लोकांचा जीव गेला तर…

“माझा भाऊ राहुल गायकवाड आतमध्ये आहे. तो बुधवारी दीड वाजेपासून आतमध्ये आहे. सनी माने, नागेश गायकवाड आणि राहुल गायकवाड हे तिघे देखील आतमध्ये आहेत. काल रात्री जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आता देखील आहे, त्यांनी रात्रभर काहीही काम केलेले नाही. आमचे माणसं आतमध्ये जिवंत आहेत की नाही हे देखील आम्हाला माहीत नाही. घरचे आम्हाला सर्वांना सारखे फोन करून विचारत आहेत तेथे काय परिस्थिती आहे. आज काही काम केले नाही, काल काम दिसले पण परवा तेच काम केले असते तर आज माणसं आमच्या इथे उभे असते. या लोकांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा जीव गेला तर हे लोक त्याची जबाबदारी घेणार आहेत का? असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केलाय.

Moshi Building Collapse: सर्व लोकप्रतिनिधींनी येथे यायला हवे

महापौरांसह सर्व लोकप्रतिनिधींनी येथे यायला हवे. तरच ही कामे पटापट होतील. लोकप्रतिनिधी फक्त आले आणि निघून गेले, ते कुठल्या नातेवाईकाला भेटले देखील नाही, काही विचारपूस देखील केलेली नाही. ते येतात दोन शब्द बोलतात आणि निघून जातात, असा आरोप देखील नातेवाईकांना केला.

Moshi Building Collapse: पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत

हा मानवनिर्मित डोंगर रचण्यात आला होता, ही महापालिकेची चूक आहे. आयुक्त साहेब खोटं बोलत आहेत, मी लहानपणापासून येथील कचऱ्याचा डोंगर पाहत आहे. हा डोंगर फक्त वीस फुटापर्यंत हवा तो 180 फुटापर्यंत गेला होता. 180 फुटाचा डोंगर कोसळल्यामुळे ही बिल्डिंग कोसळली. आयुक्त फक्त जबाबदारी झटकून देत आहेत, त्यांना माणसाशी काहीही घेणं-देणं नाही. त्यांना फक्त आपले पद महत्त्वाचे आहे, काल ते वारकऱ्यांमध्ये जाऊन फुगडी खेळत होते. आम्ही पण वारकरी संप्रदायातले आहोत. सध्याची परिस्थिती त्यांनी समजून घ्यायला हवी, इथला माणूस गेलेला परत येणार नाही. त्यांचे जास्त कर्तव्य कुठे आहे हे त्यांनी ओळखावे.

Moshi Building Collapse: एखाद्या मंत्र्यांचा मुलगा अडकला असता तर…

महापालिकेचे काम मूर्खपणाचे आहे. आता मंत्र्यांवरच गुन्हा दाखल व्हायला हवा. कंत्राटदाराचे देखील कोणीही माणसं इथे उपलब्ध नाहीत. पालकमंत्री सुनेत्रा पवार देखील इथे आलेल्या नाहीत. ही सर्व चूक महापालिका आयुक्तांची आहे. यात एखाद्या मंत्र्यांचा मुलगा अडकला असता तर मुंबई ते दिल्लीपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी येथे पळत आले असते. मात्र इथे गरिबांचे लोक अडकून पडले आहेत, त्यामुळे येथे कोणीही आलेले नाही,” असा संताप नातेवाईकांनी प्रशासनावर व्यक्त केलाय.

Moshi Building Collapse: ‘आई… आई… अशी हाक ऐकू येत होती’

“काल रात्री साडेबारा वाजता एकाला बाहेर काढण्यात आले. तो स्वतः सांगत होता की सगळे आतमध्ये आहेत. त्यांना खूप लागले आहे. ते ‘आई… आई…’ अशी हाक मारत आहेत. पण अजूनपर्यंत या लोकांनी त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत,” असे देखील एका नातेवाईकाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *