चर्चगेट ते विरार या प्रवासासाठी नागरिकांना साधारणपणे 1.30 ते 2 तास जातात. तसंच, पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दी ही विरार ते चर्चगेट या मार्गावर असते. तुम्हीदेखील चर्चगेट ते विरार असा प्रवास दररोज करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता चर्चगेट ते विरार दरम्यान उपनगरी लोकलमध्ये खाद्यपदार्थाव्यतिरिक्त (नॉन-केटरिंग) वस्तूंच्या विक्रीसाठी 40 अधिकृत विक्रेते नेमण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात येणार आहे. याचा फायदा थेट पश्चिम रेल्वेला होणार आहे.
लोकलमध्ये अधिकृत विक्रेते नेमल्यानंतर पश्चिम रेल्वेला दरवर्षी अंदाजे 25 ते 27 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तसंच, बेकायदा फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासही या योजनेची मदत होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
सध्या चर्चगेट-विरार उपनगरी मार्गावर रोज सरासरी 20 ते 25 बेकायदा विक्रेते कारवाईत आढळतात. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि वाणिज्य विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात असली, तरी बेकायदा विक्रीचे प्रमाण पूर्णपणे कमी झालेले नाही. यामुळेच मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वेनेही अधिकृत विक्रेता व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नियुक्त होणाऱ्या विक्रेत्यांना अधिकृत ओळखपत्र आणि परवाना दिला जाणार आहे.
परवानगीशिवाय लोकलमध्ये विक्री करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करणे सोपे होईल. या योजनेमुळे प्रवाशांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच वस्तू खरेदी करता येतील, तसेच रेल्वेलाही अतिरिक्त महसूल मिळेल. बेकायदा फेरीवाल्यांचे प्रमाण कमी करण्यासही मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणत्या वस्तूंची विक्री होणार?
अधिकृत विक्रेत्यांना पेन, रूमाल, मासिके, मोबाइल अॅक्सेसरीज, खेळणी, लहान घरगुती वस्तू यासह इतर ‘नॉन-केटरिंग’ वस्तू विकण्याची परवानगी असेल.
महिला डबे ‘संपर्क’ क्षेत्रात
मध्य रेल्वेने मुंबई उपनगरी रेल्वेवरील सर्व 794 महिला डब्यांमध्ये ‘इमर्जन्सी टॉकबॅक’ यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत थेट लोकलच्या गार्डशी संपर्क साधता येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र अद्याप 45 महिला डबे या सुविधेपासून वंचित आहेत.
आपत्कालीन स्थितीत महिला प्रवाशांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रत्येक महिला डब्यात टॉकबॅक बटण बसवण्यात आले आहे. हे बटण लोकलच्या गार्डच्या केबिनमधील यंत्रणेशी जोडलेले आहे. प्रवाशांनी तीन सेकंद बटण दाबून ठेवल्यानंतर गार्डच्या केबिनमधील इमर्जन्सी रिस्पॉन्स युनिटवर सूचना मिळते. त्यानंतर संबंधित प्रवाशाशी थेट संवाद साधणे शक्य होते.
