Headlines

Pune News: आज मध्यरात्रीपासून पुण्यात मोठा बदल! 3 सप्टेंबरपर्यंत ट्रॅफिकच ट्रॅफिक, कारण…

पुणेकरांसाठी एक टेन्शन वाढवणारी बातमी आहे. आज मध्यरात्रीपासून अगदी सप्टेंबरपर्यंत पुणे शहरातील वाहतुककोंडी वाढू शकते. यासाठी कारण ठरणार आहे, पुण्याती अत्यंत वर्दळीचा पूल बंद राहणं! तब्बल तीन महिने हा पूल बंद ठेवण्यात येणार असून यावरुन कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नाही. त्यामुळेच संपूर्ण पावसाळ्यात या पुलावरुन एकही गाडी जाणार नाही. नेमका हा प्रकार काय आणि एवढी वाहतुककोंडी होण्याची कल्पना असूनही हा पूल का बंद ठेवला जाणार, जाणून घेऊयात…

कोणता पूल अन् का बंद केला जाणार?

 

आज मध्यरात्रीपासून 5 सप्टेंबरपर्यंत पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला मध्यवर्ती पेठांशी जोडणाऱ्या पादचारी पूलाच्या कामासाठी हा पूल बंद केला जाणार आहे. दरम्यान, नदी पात्रातील रस्ता मात्र वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला असून, डेक्कन जिमखाना स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिज या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे. भिडे पूल हा मुठा नदीवरील 88 मीटर लांबीचा पूल आहे. 2000 साली तो सुरू झाला होता. आता तीन महिने केले जाणारे हे काम पूर्ण झाल्यावर पूल पुन्हा नियमित उघडेल.

 नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने निर्णय

डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणारा पादचारी पूल मुठा नदीवरील भिडे पुलाच्या वरच्या बाजूला बांधण्यात येत आहे. या पादचारी पूलामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिकांना, तसेच विद्यार्थ्यांसाठी ये-जा करणे सोपे होणार आहे. सध्या पुलाचे काम सुरु असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने हा पूल बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती महामेट्रोकडून निवेदनाद्वारे देण्यात आली. डेक्कन-नारायण पेठ भागात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवासाचे नियोजन आगोदर करणं फायद्याचं ठरु शकतं.

संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाला मध्यवर्ती पेठांशी जोडणारा पादचारी पूल

दरम्यान, वनाझ ते रामवाडी या मार्गीकेतील छत्रपती संभाजी उद्यान आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकांना शहराच्या मध्यवर्ती पेठांशी जोडण्याकरिता पादचारी पूल बांधण्यात येत आहेत. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाला मध्यवर्ती पेठांशी जोडणारा पादचारी पूल आता नागरिकांसाठी खुला झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *